Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला. या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने महत्वाची भूमिका बजावली. तिसरा सामना जिंकल्यानंतर संघाने हॉटेलमध्ये केक कापून सेलिब्रेशन केले. यादरम्यान, यशस्वी जयसवालने रोहित शर्माला केक भरवण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने त्यास नकार दिला. याचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहितवर फिटनेसमुळे टीका...
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जगभर ओळखला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून रोहितच्या फिटनेसवर अनेकदा टीका आणि प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, त्याने या टीकांकडे दुर्लक्ष करत आपल्या खेळ आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. याचाचा परिणाम ऑस्ट्रेलिया आणि नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्यांच्या दमदार कामगिरीत स्पष्ट दिसला.
केक नको, परत जाड होईल...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयानंतर संघाने केक कापून सेलिब्रेशन केले. यादरम्यान, यशस्वी जयसवालने आधी विराट कोहलीला केक खाऊ घातला, त्यानंतर रोहितकडे केक घेऊन आला. मात्र, रोहितने हसत हसत नकार दिला. “केक नको, मी परत जाडा होईल...!” अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. हे ऐकताच तिथे उपस्थित सर्व खेळाडू जोरात हसू लागले.
दक्षिण आफ्रिकेविरोधात रोहितची दमदार कामगिरी...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये रोहितने 57 धावा, दुसऱ्या वनडेमध्ये 14 धावा आणि तिसऱ्या वनडेमध्ये 75 धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली.
कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिज
भारताने तिसरा वनडे 9 विकेट्सने जिंकत मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. यशस्वी जायसवालने तिसऱ्या सामन्यात 121 चेंडूत 116 धावा ठोकल्या. या पूर्ण मालिकेत कोहलीने सर्वाधिक 302 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. यामुळेच कोहलीला प्लेअर ऑफ द सीरिजने गौरविण्यात आले.