Pune Can Be RCB's New Home In IPL 2026 : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघानं २०२५ च्या हंगामात १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. IPL चॅम्पियन संघ आगामी हंगामात आपले सर्व सामने बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल, अशी अपेक्षा होती. पण बंगळुरुच्या चाहत्यांची घोर निराशा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. RCB संघ आगामी हंगामासाठी आपले घरचे मैदानात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL २०२६ च्या हंगामात RCB चं होम ग्राउंड बदलणार
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२६ स्पर्धेत RCB चा संघ घरच्या मैदानातील सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मैदानावर खेळण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिली ट्रॉफी जिंकल्यावर जून २०२५ मध्ये बंगळुरुच्या मैदानात झालेल्या विजयी जल्लोषाला चेंगराचेंगरीमुळे गालबोट लागले होते. या दुर्देवी घटनेनंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या स्पर्धेसाठी असुरक्षित असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील या मैदानातील सामनेही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. याच कारणामुळे आगामी हंगामात RCB च्या संघाला आपले घरचे मैदान बदलण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
IPL 2026 Auction : ठरलं! IPL च्या लिलावासंदर्भात सलग तिसऱ्यांदा असं घडणार; जाणून घ्या सविस्तर
... तर पुण्याच्या मैदानात खेळवण्यात येतील RCB चे सर्व सामने
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पाई यांनीही विराट कोहलीचा संघ आगामी हंगामात पुण्याच्या मैदानात खेळताना दिसेल यासंदर्भातील हिंट दिली आहे. ते म्हणाले आहेत की, RCB संघाचे घरच्या मैदानातील सर्व सामने पुण्याच्या मैदानात खेळवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. कर्नाटकातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तिथं अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही आमचं स्टेडियम ऑफर केलं आहे. काही तांत्रिक बाबी निश्चित होणं बाकी आहे, पण सगळं सुरळीत झालं तर RCBचे सामने पुण्यात खेळले जाऊ शकतात."
जर असं घडलं तर पहिल्यांदाच RCB दुसऱ्या मैदानावर खेळणार सर्व सामने
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ या स्पर्धेत सहभागी आहे. २००९ मध्ये संपूर्ण स्पर्धा ही दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात खेळवण्यात आली होती. हा हंगाम वगळता आतापर्यंत प्रत्येक हंगामात RCB संघाने होम ग्राउंडच्या रुपात बंगळुरुच्या मैदानातच सर्व सामने खेळले आहेत. पण आगामी हंगामात पहिल्यांदाच ते दुसऱ्या मैदानात खेळताना पाहायला मिळू शकते.