IND vs SA T20I, Jasprit Bumrah Creates History : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं नव्या विक्रमाला गवणी घातली. बेबी एबी अर्थात डेवॉल्ड ब्रेविसच्या रुपात या सामन्यात पहिली विकेट खात्यात जमा करताच जसप्रीत बुमराहनं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा टप्पा पार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला बुमराह
क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये गोलंदाजीत शंभर विकेट्सचा पल्ला गाठणारा अर्शदीप सिंगनंतर तो भारताचा दुसरा गोलंदाज आहे. पण या कामगिरीसह त्याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात १०० पेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा डाव साधत खास विक्रम आपल्या नावे केला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शंभरपेक्षा अधिक विकेट घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले...
एलिट क्लबमध्ये मारली एन्ट्री
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह आधी चार गोलंदाजांनी तिन्ही प्रकारात शंभर विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. या एलिट क्लबमध्ये आता जसप्रीत बुमराहचीही एन्ट्री झाली आहे. जसप्रीत बुमराहशिवाय लसिथ मलिंगा (श्रीलंका), टिम साउदी (न्यूझीलंड), शाकिब अल हसन (बांगलादेश) आणि शाहीन शाह अफ्रिदी (पाकिस्तान) या गोलंदाजांनी तिन्ही प्रकारात शंभर विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
बुमराच्या खात्यात कोणत्या प्रकारात किती विकेट्स?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कटकच्या मैदानातील सामन्यात बुमराहनं ३ षटकात १७ धावा खर्च करून २ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहच्या खात्यात २३४ विकेट्स जमा असून वनडेत त्याने आतापर्यंत १४९ विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर वनडेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. पहिल्यांदाच भारतीय संघ टी-२० सामन्यात अर्शदीप सिंग आणि बुमराहच्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरला. वर्ल्ड कप स्पर्धेतही हाच डाव भारतीय संघ खेळेल, अशी अपेक्षा आहे.