भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, एक अविश्वसनीय घटना घडली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपले ५२ वे एकदिवसीय शतक झळकावताच, उत्साही चाहता सुरक्षा भेदून थेट मैदानात घुसला आणि त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मैदानाबाहेर नेले.
कोहलीने चौकार मारून आपले शतक पूर्ण करताच एक चाहता सुरक्षा रक्षकांचा वेढा तोडून मैदानात गेला आणि त्याने विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी कर्मचारी ताबडतोब तिथे पोहोचले आणि त्या तरुणाला त्यांनी मैदानाबाहेर काढले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीनंतर तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे आणि विराट कोहलीचा मोठा चाहता असल्याचे उघड झाले.
हटियाचे डीएसपी प्रमोद मिश्रा यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, "हा तरुण अल्पवयीन होता आणि आपल्या आवडत्या खेळाडूला शतक झळकावताना पाहून तो उत्साहात सुरक्षा घेरा ओलांडून मैदानावर गेला. क्रिकेट व्यवस्थापनाकडून किंवा इतर कोणाकडूनही त्याच्याविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे त्याला जामिनावर सोडण्यात आले. तो अल्पवयीन असल्याने आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याने त्याला सोडण्यात आले.
द. आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली. त्याने केवळ १२० चेंडूत १३५ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. कोहलीच्या या महत्त्वपूर्ण शतकी खेळीने भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.