दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर सर्वांच्या नजरा दोन्ही संघांत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेकडे लागल्या होत्या. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झाल्याने मजबूत बनलेल्या भारतीय संघाने या मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर २-१ अशा फरकाने मात केली. शनिवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव करत भारतीय संघानं मालिकाविजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर या मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहलीचारोहित शर्मा आणि गौतम गंभीरसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील विराट कोहलीच्या बॉडी लँग्वेजची आता चर्चा होत आहे.
विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २७१ धावांच्या आव्हानाचा भारतीय संघाने यशस्वी जयस्वालचं नाबाद शतक आणि रोहित शर्मा व विराट कोहलीने ठोकलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ९ गडी राखून पाठलाग केला. त्यानंतर विराट कोहलीने आपले सर्व सहकारी आणि सहकाऱ्यांची गळाभेट घेत तसेच हस्तांदोलन करत विजयाचा आनंद साजरा केला. त्यावेळी इतर खेळांडूंसोबत प्रशिक्षक गौतम गंभीर हासुद्धा अभिनंदन करण्यासाठी पोहोचला होता. विराट कोहलीने त्याच्याशीही हस्तांदोलन केले. मात्र त्याच्या मागून आलेल्या रोहित शर्मा याची विराटने ज्या उत्साहाने गळाभेट घेतली तसा उत्साह गंभीरशी हस्तांदोलन करताना दिसला नाही. आता विराट कोहलीच्या गंभीर आणि रोहित शर्माची भेट घेतानाच्या बॉडी लँग्वेजची तुलना करत आहेत. तसेच गंभीरशी हस्तांदोलन करताना विराटने केवळ औपचारिकता निभावली, त्यात उत्साह दिसून आला नाही, असेही चाहते या भेटीचा व्हिडीओ पाहून म्हणत आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकाविजयानंतर गौतम गंभीर याने २०२७ च्या विश्वचषकासाठीच्या संघनिवडीबाबत मोठं विधान केलं आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी अद्याप दोन वर्षे आहेत. सद्यस्थितीत ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि इतर तरुण खेळाडूंना अधिक संधी देण्याची आवश्यकता आहे. सध्यातरी वर्तमान काळाचा विचार करणं आवश्यक आहे. तसेच जे तरुण खेळाडू संघात येत आहेत, त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या संधीचा फायदा उचलला पाहिजे, असा सल्लाही गौतम गंभीरने दिला.