IND vs SA : आता हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर आहे गेल, बटलर अन् वार्नरचा रेकॉर्ड

रोहितला खुणावतोय सिक्सरचा आणखी एक रेकॉर्ड; इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भात सविस्तर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेमध्ये सक्रीय असलेला रोहित शर्मा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील सिडनीच्या मैदानातील कडक शतकी खेळीनंतर त्याने रांचीच्या घरच्या मैदानातील वनडेत दमदार खेळी साकारली.

रांची वनडेतील अर्धशतकी खेळीत रोहित शर्मानं ३ उत्तुंग षटकार मारत पाकिस्तानचा माजी स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत वनडेत सर्वाधिक षटकारांचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. त्याच्या खात्यात ३५२ षटकार जमा आहेत.

आता रायपूरच्या मैदानातील वनडेत रोहित शर्माला आणखी एक विक्रम खुणावत आहे. ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर, इंग्लंडचा जोस बटलर आणि कॅरेबियन स्टार ख्रिस गेलला मागे टाकू शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेविड वॉर्नर ६४ षटकारांसह सर्वात अव्वलस्थानावर आहे.

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर याने आतापर्यतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६३ षटकार मारले आहेत. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेल याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६१ षटकार मारले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एक षटकार मारताच रोहित शर्मा ख्रिस गेलला मागे टाकेल. जर हिटमॅनची बॅट पुन्हा तळपली आणि त्याच्या भात्यातून ४ षटकार पाहायला मिळाले तर तो या यादीत बटलर आणि वॉर्नरलाही मागे टाकून अव्वलस्थानी विराजमान होऊ शकतो.

'वनडे सिक्सर किंग'साठी हा रेकॉर्ड अगदी सहज शक्य आहे. आता फक्त हे पाहायचं आहे की, हा डाव तो दुसऱ्या वनडेत साधणार की, त्याला यासाठी आणखी एक डाव लागणार ते पाहण्याजोगे असेल.