दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर हार्दिक पांड्याचा हार्ड हिटिंग शो पाहायला मिळाला. दुखापतीतून कमबॅक करताना पांड्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील ६ वे अर्धशतक झळकावले. उत्तुंग फटका मारून षटकारासह अर्धशतकाला गवसणी घालताना हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा खास पल्लाही गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडूनच सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा २०५ षटकारांसह टॉपला आहे. त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी शंभरपेक्षा अधिक षटकार केले आहेत. या यादीत आता हार्दिक पांड्याने एन्ट्री मारली आहे.
२०५ - रोहित शर्मा
१५५ -सूर्यकुमार यादव
१२४ - विराट कोहली
१०० - हार्दिक पांड्या
९९ - केएल राहुल
२०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह पांड्यानं केली नाबाद ५९ धावांची खेळी
आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर हार्दिक पांड्याने आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश करताना २८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २१०.७१ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५९ धावांच खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १७५ धावांपर्यंत मजल मारली.