Glenn Maxwell IPL 2026 Auction: आयपीएल २०२६चा लिलाव १६ डिसेंबरला होणार आहे. यासाठी १३५५ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदाच्या लिलावात एका बड्या खेळाडूचे नाव समाविष्ट नसल्याने खळबळ उडाली आहे. आयपीएलच्या विविध हंगामांमधून तब्बल ९२ कोटी रुपये कमावणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या लिलावात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने आयपीएल २०२६ पासून दूर राहण्याच्या निर्णय घेतल्याने सारेच आश्चर्यचकित झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत क्रिकेट लीगपासून दूर राहण्याचे कारण काय, याची कल्पना नाही. पण यंदाच्या आयपीएल लिलावासाठीची नोंदणी केलेल्या खेळाडूंची यादी समोर आल्यानंतर हे लक्षात आले की त्याने या लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही.
गेल्या हंगामात पंजाब किंग्जचा भिडू
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा भाग होता. फ्रँचायझीने त्याला ४ कोटी २० लाखांची बोली लावून विकत घेतले होते. आयपीएल २०२६च्या लिलावापूर्वी पंजाब किंग्ज संघ व्यवस्थापन फ्रँचायझीने मॅक्सवेलला सोडले. त्यानंतर मॅक्सवेलचा आतापर्यंतचा इतिहास पाहता अनेक संघ त्याच्यावर नजर ठेवून होते. पण अशी परिस्थितीत त्याने लिलावासाठी नोंदणी न करून साऱ्यांनाच बुचकळ्यात टाकले. पण आता सध्यातरी असे मानले जात आहे की, तो आयपीएल २०२६ मध्ये खेळणार नाही.
मॅक्सवेलच्या निर्णयामागील कारण काय?
मॅक्सवेलने आयपीएल २०२६ साठी नोंदणी न करण्याच्या निर्णयामागील कारण अद्याप उघड झालेले नाही. तो अलीकडेच दुखापतीतून बरा झाला आहे. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही परतला आणि टीम इंडियाविरूद्धचा टी२० सामनाही खेळला. अशा वेळी, लिलावात सहभागी न होण्यामागे दुखापत हे कारण असेल असे म्हणता येणार नाही. अशा वेळी, मॅक्सवेलच्या निर्णयामागील खरे कारण जाणून घेण्यासाठी क्रिकेटचाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.
मॅक्सवेलची 'आयपीएल'मधून सुमारे ९२ कोटींची कमाई
मॅक्सवेलने आयपीएलमध्ये एकूण चार संघांसाठी १३ हंगाम खेळले आहेत. त्याने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने आयपीएलमधून अंदाजे ₹९२ कोटी कमावले आहेत. मॅक्सवेलला आयपीएल २०२१ मध्ये जेव्हा आरसीबीने खरेदी केले, तेव्हा त्याला सर्वाधिक १४.२५ कोटींचे उत्पन्न मिळाले. मॅक्सवेलने सर्वाधिक सहा आयपीएल हंगाम पंजाब किंग्ज संघासाठी खेळले आहेत