बाबर बनू शकतो ‘नंबर वन’ फलंदाज : कार्तिक

बाबर सध्या टी-२० आणि वन डे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:26 AM2022-05-28T05:26:51+5:302022-05-28T05:27:19+5:30

whatsapp join usJoin us
Babur can be 'number one' batsman: Karthik | बाबर बनू शकतो ‘नंबर वन’ फलंदाज : कार्तिक

बाबर बनू शकतो ‘नंबर वन’ फलंदाज : कार्तिक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा  सर्व प्रकारात लवकरच नंबर वन बनू शकतो. त्याला फलंदाजी तंत्र बदलल्याचा लाभ होत आहे, असे भाकीत भारताचा अनुभवी यष्टिरक्षक- फलंदाज दिनेश कार्तिकने केले आहे. 

तिन्ही प्रकारांत सातत्याने दमदार कामगिरी करणारा बाबर सध्या टी-२० आणि वन डे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तो लवकरच तिन्ही प्रकारांत अव्वलस्थानी येणारा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज बनेल, असा विश्वास कार्तिकने व्यक्त केला. ‘द आयसीसी रिव्ह्यू’मध्ये बोलताना कार्तिक पुढे म्हणाला, ‘बाबर हा तिन्ही प्रकारांत अव्वलस्थानावर विराजमान होण्यास सक्षम आहे. त्याने वेगवेगळ्या स्थानावर फलंदाजी करताना तिन्ही प्रकारात कामगिरीचा ठसा उमटविला आहे.  माझ्या मते, त्याच्यात कमालीची क्षमता आहे.’

कार्तिकच्या मते,  बाबरने स्वत:चे फलंदाजी तंत्र बदलले. त्याचा त्याला लाभ झाला.  जेव्हा मी त्याला फलंदाजी करताना पाहतो तेव्हा दोन गोष्टी लक्षात येतात. त्यापैकी एक म्हणजे संतुलन आणि दुसरी अर्थात चेंडू खेळतेवेळी तो बॅटच्या विशिष्ट भागात लागतो, ते अचूक टायमिंग. फ्रंटफूट असो वा बॅकफूट, स्ट्राईक करण्याची बाबरमधील क्षमता शानदार आहे. सर्वांत ताकदवान फटका ज्या जागेवर मारला जातो अशा ठिकाणी बाबर फटके मारतो हे त्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  कसोटी क्रमवारीत बाबर सध्या पाचव्या स्थानावर आहे. कसोटी फलंदाजीत गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन, विराट कोहली, इंग्लंडचा ज्यो रुट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांनी वर्चस्व गाजविले आहे. कार्तिक म्हणाला, ‘बाबर हा लवकरच दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.’

कार्तिकने बाबर आझमचे केलेले कौतुक काहींना आवडलेले नाही. सोशल मीडियावर तो ट्रोल झाला. काही चाहते इतके नाराज झाले की त्यांनी कार्तिकचे भारतीय नागरिकत्व गोठविण्याची मागणी केली. एकाने लिहिले, ‘आता तू अंडरग्राऊंड होण्याची तयारी कर!’ अन्य एका युजरने लिहिले, ‘कोण हा बाबर आझम?’ सोबत राग व्यक्त करणारी इमोजी पोस्ट केली. दुसऱ्याने लिहिले, ‘कार्तिकला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवा. कसेबसे संघात स्थान मिळाले होते, आता मालिकेदरम्यान बेंचवर बसून राहशील.’ ‘दिनेश कार्तिक राष्ट्रविरोधी।’, ‘देशद्रोही कार्तिक।’ असेही काहींनी लिहिले.

आचारसंहिता उल्लंघनावरून बीसीसीआयने फटकारले
अहमदाबाद : आरसीबीचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने कोलकाता येथे लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटरदरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने त्याला फटकारले आहे. त्याने कोणता गुन्हा केला, हे मात्र बीसीसीआयने उघड केलेले नाही. बीसीसीआयने म्हटले की कार्तिकने आयपीएल आचारसंहितेच्या नियम २.३ अंतर्गत गुन्हा केला. त्याने आपली शिक्षा आणि गुन्हा कबूल केला आहे, या प्रकरणी मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बांधील मानला जातो. बुधवारी आरसीबीने लखनौवर १४ धावांनी विजय मिळविला होता.

Web Title: Babur can be 'number one' batsman: Karthik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.