T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक

टी-२० क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. फलंदाजांच्या अति आक्रमकतेला तोंड देताना गोलंदाजांची मोठी ‘कसोटी’ लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 10:13 AM2021-10-23T10:13:08+5:302021-10-23T10:13:41+5:30

whatsapp join usJoin us
All rounder going to play crucial role in T20 World Cup | T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक

T20 World Cup: अष्टपैलू गाजवणार टी-२० विश्वचषक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टी-२० क्रिकेट म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. फलंदाजांच्या अति आक्रमकतेला तोंड देताना गोलंदाजांची मोठी ‘कसोटी’ लागते. मात्र, कालांतराने गोलंदाजही अधिक कल्पक होऊ लागले आणि अचानकपणे स्लोअर बॉल, नकल बॉल, कॅरम बॉल, असे विविध प्रकारचे चेंडू टाकत गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. अवघ्या एक- दोन षटकांमध्ये सामना फिरू लागला आणि यामध्ये निर्णायक ठरू लागले ते अष्टपैलू खेळाडू. या अष्टपैलूंमुळे अनेक संघांनी अक्षरश: हातातून गेलेला सामना जिंकला आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही अशाच अष्टपैलूंवर सर्वांची नजर असेल आणि या निमित्तानेचे काही आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंचा घेतलेला हा आढावा...

शाकीब अल हसन (बांगलादेश)- आंतरराष्ट्रीय टी-२० अष्टपैलू क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या शाकीबने यंदाच्या विश्वचषक पात्रता फेरीत आपली छाप पाडत संघाला मुख्य फेरीत नेण्यात मोलाचे योगदान दिले. फलंदाजी आणि गोलंदाजीत अवघ्या एक- दोन षटकांत सामन्याचे चित्र पालटण्याची त्याची क्षमता आहे. बांगलादेशाविरुद्ध खेळताना सर्व संघांना त्याचा धोका असेल. शाकीबने ९१ टी-२० सामन्यांत १,८७१ धावा करताना ९ अर्धशतके झळकावली असून, ११५ बळीही घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० बळी आणि एक हजारांहून अधिक धावा, अशी कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू.

ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)- क्रिकेट विश्वातील स्फोटक फलंदाजांमध्ये समावेश होत असलेला मॅक्सवेल आपल्या फिरकीद्वारे प्रतिस्पर्धी संघाची दाणादाणी उडवू शकतो. फलंदाजीत कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद त्याने अनेकदा दाखवून दिली आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत ७१ टी-२० सामन्यांतून १,७८९ धावा केल्या असून, ३ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ३१ बळीही घेतले आहेत.

रवींद्र जडेजा (भारत)- टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड असलेला जडेजा भल्याभल्या संघांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली, तेव्हा तेव्हा जडेजाने आपली भूमिका चोख बजावली आहे. आयपीएलमध्येही तो सीएसके संघाचा तारणहार ठरला आहे. जडेजाने आतापर्यंत ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यामध्ये २१७ धावा फटकावताना ३९ बळी घेतले आहेत. अखेरच्या काही षटकांमध्ये फलंदाजी मिळत असली, तरी त्याची फटकेबाजी भारतासाठी निर्णायक ठरली आहे.

मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला नबी क्रिकेटविश्वातील आघाडीच्या संघांना आव्हान देत आहे. आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादकडून छाप पाडत प्रभावी कामगिरी केली. ८१ टी-२० सामने खेळताना नबीने १,३९६ धावा काढत ४ अर्धशतके झळकावली आहेत, तसेच त्याने ७२ बळी घेत शानदार अष्टपैलू खेळी केली आहे.

आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज)- वेस्ट इंडीजचा हा हुकमी अष्टपैलू फॉर्ममध्ये असेल, तर त्याला रोखणे प्रतिस्पर्धी संघाला अशक्यच. सध्या दुखापतीमुळे बेजार असलेला रसेल वेगाने तंदुरुस्त होत आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला रसेलने अनेकदा एकहाती विजयी केली आहे. भेदक माऱ्यासह विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर रसेल अत्यंत धोकादायक अष्टपैलू ठरतो. त्याने विंडीजकडून ६२ टी-२० सामने खेळताना एका अर्धशतकासह ७१६ धावा करतानाच ३६ बळी घेतले आहेत

Web Title: All rounder going to play crucial role in T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.