न्यूझीलंडचा पाक दौरा रद्द!; सुरक्षायंत्रणेवर विश्वास नसल्याने अखेरच्या क्षणी माघार

सुरक्षा कारणास्तव दौरा स्थगित करण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:46 AM2021-09-18T05:46:13+5:302021-09-18T05:47:49+5:30

whatsapp join usJoin us
new zealand pakistan tour cancelled pdc | न्यूझीलंडचा पाक दौरा रद्द!; सुरक्षायंत्रणेवर विश्वास नसल्याने अखेरच्या क्षणी माघार

न्यूझीलंडचा पाक दौरा रद्द!; सुरक्षायंत्रणेवर विश्वास नसल्याने अखेरच्या क्षणी माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला खरा मात्र सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नसल्याचे कारण देत शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी दौरा रद्द केला. सुरक्षा कारणास्तव दौरा स्थगित करण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केले. दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र न्यूझीलंड संघाला सुरक्षेचा कुठलाही धोका नव्हता, असे म्हटले आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांचे आयोजन होणार होते.

दोन्ही संघ हॉटेलमधून बाहेर पडू न शकल्याने रावळपिंडी स्टेडियमवर आयोजित हा सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. यानंतर न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी एक वक्तव्य करीत आम्हाला मिळत असलेल्या सूचनांमुळे हा दौरा सुरू ठेवणे शक्य नसल्याचे सांगितले.
ते म्हणाले,‘ पीसीबीसाठी हा मोठा धक्का आहे हे समजू शकतो, मात्र सुरक्षा सर्वोच्च असल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले.’

न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू संघटनेचे सीईओ हीथ मिल्स यांनी देखील बोर्डाच्या विचाराशी सहमती दर्शविली. मिल्स म्हणाले,‘ खेळाडू सुरक्षित असून प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट हितासाठी काम करीत आहे.’ न्यूझीलंड क्रिकेटने संभाव्य धोका सांगितला नाही. शिवाय संघाच्या परतण्याच्या पर्यायांचा देखील खुलासा केलेला नाही. पीसीबीने सर्व घडामोडींवर भाष्य करताना न्यूझीलंडचा मालिका स्थगित करण्याचा निर्णय एकतर्फी असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांची न्यूझीलंडच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती

- पाकिस्तानकडून हा दौरा वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना जेसिंडा अर्डन यांना फोन करून सुरक्षेविषयी पूर्ण आश्वासन दिले.
 
- यावेळी जगातली सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा आपल्याकडे असल्याचा दावा इम्रान यांनी केला. त्यामुळे न्यूझीलंड संघाच्या सुरक्षितेबाबत पूर्ण हमी देण्याची तयारी इम्रान यांनी दर्शिविली. मात्र, इम्रान यांच्या या बोलण्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी न्यूझीलंड आपला दौरा रद्द करण्याविषयी ठाम राहिले.

‘प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला गेला नव्हता. त्यामुळे सामना होणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात होती. “आम्ही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सुरक्षेबाबत कळवले आणि त्यांनी एकतर्फी निर्णय घेत मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी आणि सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. नियोजित सामने सुरु ठेवण्यासाठी पीसीबी सज्ज आहे. मात्र पाकिस्तान आणि जगभरातील क्रीडाप्रेमी शेवटच्या क्षणाला मालिका स्थगित केल्याने निराश होतील.’ – पीसीबी

“आम्हाला दिलेल्या सल्ल्यानुसार दौरा सुरू ठेवणे शक्य नव्हते. मला वाटते पीसीबीसाठी हा धक्का असेल. पण खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी दौरा स्थगित करणे योग्य आहे.’ - डेविड व्हाईट, न्यूझीलंड क्रिकेट

..,तर होऊ शकते मोठे नुकसान

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर्षीच्या सुरुवातीला १५०० कोटी रुपयांना त्यांच्या सामन्यांचे प्रसारण हक्क विकले. यात पीएसएलचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला १५० ते २०० करोड रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे न्यूझीलंडकडून दौरा रद्द करण्याची पाकिस्तानला चांगलीच किंमत मोजावी लागू शकते.
 

Web Title: new zealand pakistan tour cancelled pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.