MS Dhoni makes himself unavailable for West Indies tour, says bcci official | धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय
धोनीचं निवृत्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल?, BCCIला कळवला मोठा निर्णय

ठळक मुद्देधोनी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या डावाला 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरला.महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लष्करी जवानांसोबत काम करायची इच्छा धोनीनं आधीच बोलून दाखवली आहे.

'कॅप्टन कूल' हे बिरूद जगात मिरवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वोत्कृष्ट 'फिनिशर' म्हणून लौकिक असलेला धोनी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या डावाला 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरला. त्याच्या संथ खेळीवर बरीच टीका-टिप्पणीही झाली-होतेय. त्यामुळेच धोनीच्या निरोपाची वेळ जवळ आल्याचं बोललं जातंय. बीसीसीआयनं तशा हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, धोनीनं एक मोठा निर्णय बीसीसीआयला कळवलाय. हे निवृत्तीच्या दिशेनं त्यानं टाकलेलं पहिलं पाऊल तर नाही ना, अशी कुजबुज क्रिकेटवर्तुळात सुरू झालीय. 

पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का?

महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. या कालावधीत निमलष्करी जवानांसोबत 'ऑन फिल्ड' काम करायचं त्यानं पक्कं केलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीनं निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे.

'धोनीने ट्वेन्टी-20 विश्वचषक खेळून निवृत्त व्हावं' जाणून घ्या, सांगतंय कोण...

'धोनी निवृत्त होत नाहीए. निमलष्करी रेजिमेंटला दोन महिने वेळ देण्याचं त्यानं आधीच सांगितलं होतं. त्यासाठी तो ब्रेक घेतोय', असं बीसीसीआय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय. परंतु, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लष्करी जवानांसोबत काम करायची इच्छा धोनीनं आधीच बोलून दाखवली आहे. टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये तो मानद लेफ्टनंट कर्नल आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये या रेजिमेंटचं काम जवळून पाहायचा धोनीचा विचार आहे. त्याच दृष्टीने विंडीज दौऱ्यातून माघार घ्यायचं त्यानं ठरवलंय. म्हणजेच, क्रिकेटनंतर जे करायचंय त्या कामाचा प्रत्यक्ष अनुभवच धोनी दोन महिन्यांत घेणार आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच, या अनुभवानंतर तो क्रिकेट करिअरबाबत ठोस निर्णय घेऊ शकतो. 

धोनीवर टीका करण्यापूर्वी फक्त एकदा वाचाच...

बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे धोनीशी चर्चा करतील, त्याच्यापुढे निवृत्तीचा पर्याय दिला जाईल, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. धोनीन आता निवृत्त व्हावं, असं त्याच्या कुटुंबीयांनाही वाटत असल्याची माहिती माहीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिली होती. या घडामोडी पाहता, धोनीनं विंडीज दौऱ्यातून घेतलेली माघार बीसीसीआय भासवतंय तितकी साधी-सोपी नक्कीच नाही, हे स्पष्ट होतं.  

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या माघारीमुळे रिषभ पंतसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. 

English summary :
MS Dhoni will be away from the cricket field for the next two months. A BCCI official said that during this period, he has confirmed that he will work on 'field' with Indian Army (Jawan). Team India will be selected for the West Indies tour on Sunday. Dhoni has informed the selection committee chief MSK Prasad and captain Virat Kohli that he is not available for the tour.


Web Title: MS Dhoni makes himself unavailable for West Indies tour, says bcci official
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.