'जीसीए’वर लोटलीकर गट निर्विवाद, आंगले गटाचा धुव्वा, सचिवपदी विपुल फडके

गोव्यातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेल्या गोवा क्रिकेट संघटनेवर अखेर अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती सूरज लोटलीकर यांच्या पॅनलने.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:45 AM2019-09-23T07:45:15+5:302019-09-23T07:45:46+5:30

whatsapp join usJoin us
Lotlikar group won goa cricket association election | 'जीसीए’वर लोटलीकर गट निर्विवाद, आंगले गटाचा धुव्वा, सचिवपदी विपुल फडके

'जीसीए’वर लोटलीकर गट निर्विवाद, आंगले गटाचा धुव्वा, सचिवपदी विपुल फडके

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पणजी : गोव्यातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेल्या गोवा क्रिकेट संघटनेवर अखेर अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती सूरज लोटलीकर यांच्या पॅनलने. त्यांनी प्रतिस्पर्धी हेमंत आंगले गटाचा धुव्वा उडवला. तुलनेत आंगले गटाला चुरशीची टक्करही देता आली नाही. जीसीएची ही निवडणूक शांततेत पार पडली. माजी अध्यक्ष सूरज लोटलीकर हे बिनविरोध निवडून आले होते. युवा विपुल फडके याने हेमंत आंगले यांचा ७८-२४ अशा मतफरकाने पराभव केला. याबरोबरच संघटनेला युवा सचिव मिळाला. 

पर्वरी येथील गोवा क्रिकेट संघटनेच्या अकादमी मैदानावर निवडणुकीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित चार म्हणजे सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार आणि सदस्य या पदांसाठी ही निवडणूक होती. जीसीएच्या एकूण १०७ क्लबपैकी १०४ क्लबच्या पदाधिकाºयांनी मतदान केले. गोवा स्पोर्ट्स अकादमी, रायझिंग स्टार आणि एमपीटी यांनी मतदान केले नाही. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी २ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. ३ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी सुद्धा विविध क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांपुढे ही मतमोजणी झाली. त्यांचे समाधान करण्यात आले. मजमोजणीला कोणीही आक्षेप नोंदवला नाही. मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एम. मोदास्सीर, साहाय्यक निवडणूक अधिकारी नारायण नावती आणि बीसीसीआयचे निरीक्षक दुबे यांच्या निरीक्षणाखाली ही निवडणूक पार पडली. 

सचिवपदासाठी ज्येष्ठ क्रिकेटपटू हेमंत आंगले हे विपुल फडके यांना आव्हान देतील, असे वाटत होते. मात्र, विपुल याला क्लबचा मोठा पाठिंबा मिळाला. ७८ मते मिळवत विपुलने आंगले यांचा पराभव केला. आंगले यांना केवळ २४ मते मिळवता आली. संयुक्त सचिवपदासाठी देसाई-फडके गटाचे सय्यद अब्दुल माजिद यांनी सुदेश प्रभुदेसाई यांचा ८१-२२ अशा फरकाने पराभव केला. खजिनदार म्हणून जीसीएला नवा चेहरा मिळाला. परेश फडते यांनी प्रशांत फातर्पेकरचा ८३-२० अशा फरकाने पराभव केला. सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहन चोडणकर यांनी सर्वाधिक ८४ मते मिळवली. त्यांनी आंगले गटाच्या रोहन गावस देसाई यांचा पराभव केला. रोहन यांना केवळ १९ मते मिळाली. 

अंतिम निकालासह नवी व्यवस्थापकीय समिती :
अध्यक्ष : सूरज लोटलीकर (बिनविरोध)
उपाध्यक्ष : शंभा मोलू देसाई (बिनविरोध) 
सचिव : विपुल फडके वि. वि. हेमंत आंगले (७८-२४)
संयुक्त सचिव : सय्यद माजिद वि. वि. सुदेश प्रभुदेसाई (८१-२२)
खजिनदार : परेश फडते वि. वि. प्रशांत फातर्पेकर (८३-२०)
सदस्य : मोहन चोडणकर वि. वि. रोहन गावस देसाई (८४-१९) 

लोकसभेप्रमाणेच निवडणूक प्रक्रिया : नावती 
गोवा क्रिकेट संघटनेची निवडणूक ही देशातील लोकसभा, विधानसभा, पंचायत या प्रक्रियेप्रमाणेच पार पडली. निवडणूक म्हटले की आरोप-प्रत्यारोप होत असतात. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. कुठल्याही वादाशिवाय आज क्लबने मतदान केले. गेल्या ७ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होती. निवडणूक आयोगाचे नियम पूर्णपणे पाळण्यात आले, असे साहाय्यक निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 

सुरजित प्रकरणाचा राजीनाम्याशी संबध नाही : सय्यद माजिक
अल्पवयीन मुलीवर विनयभंग प्रकरणामुळे गोवा राज्य चर्चेत आले. याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजित गांगुली याला जलतरण संघटनेने तातडीने निलंबित केले. माध्यमांनी जलतरण संघटनेवर प्रश्नांचा भडिमार केला. या प्रकरणावर तत्कालीन जलतरण संघटनेचे सचिव सय्यद अब्दुल माजिक हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलले. आपण राजीनामा दिला ते केवळ गोवा क्रिकेटसाठी. या प्रकरणाचा माझ्या राजीनाम्याशी काहीही संबंध नाही. लोढा समितीच्या शिफारशीनुसार मला एकाच पदावर राहता येत होते. त्यामुळे मला जलतरण संघटना सोडावी लागली. सुरजित प्रकरणामुळे मी संघटना सोडली नाही. माझा राजीनामा मी अखिल भारतीय जलतरण संघटना आणि गोवा आॅलिम्पिक संघटना यांच्याकडे सादर केला होता. प्रसारमाध्यमांना मात्र मी कळविले नाही, असे स्पष्टीकरण माजिक यांनी दिले. माजिक आता जीसीएचे संयुक्त सचिव म्हणून काम पाहतील. 

महिन्याभरापूर्वीच निवडणुकीचा विचार : फडके 
गोवा क्रिकेट संघटनेच्या इतिहासातील सर्वात युवा सचिव म्हणून विनोद फडके यांचा मुलगा विपुल फडके याला संधी मिळाली. विपुलकडे म्हापसा विभागातील तीन-चार क्लब आहेत. क्रिकेटमध्ये तो तसा आग्रही आहे. परंतु, जीसीएच्या व्यवस्थापन समितीवर एवढ्या लवकर संधी मिळेल, याची कल्पना खुद्द विपुललाही नव्हती. वडिलांचा पाठिंबा असला तरी क्लबची भूमिका महत्त्वाची असते. निवडणुकीचा विचार माझ्या मनातही आला नव्हता. महिन्याभरापूर्वी आमच्या क्लबची बैठक झाली आणि त्यात क्लबच्या पदाधिकाºयांनी माझे नावे पुढे केले. त्यानंतर मी वडिलांना ही कल्पना सांगितली. वडिलांचे क्लबसोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्याचा फायदा मला झाला आणि मी मोठ्या फरकाने निवडून आलो, असे विपुल फडके याने सांगितले. 

स्टेडियम हीच माझी प्राथमिकता : लोटलीकर
गेल्या अनेक वर्षांपासून गोमंतकीय चाहते आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या प्रतीक्षेत आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. गेले दीड वर्ष मला ‘कूलिंग पिरियड’ मिळाला. त्यामुळे विशेष काही करता आले नाही. परंतु, तरीसुद्धा आम्ही धारगळ येथे १ लाख ८१ हजार स्क्वेअर मीटर जमीन मिळवली. याच जमिनीवर येत्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारले जाईल. त्यासाठी सरकार आणि लोकांचा पूर्ण पाठिंबा हवा आहे. आता स्टेडियम हीच माझी प्राथमिकता आहे. जीसीए निवडणुकीतून बाहेर पडण्याचा विचार माझ्या मनात आला होता. परंतु, चेतन देसाई आणि विनोद फडके यांनी मला प्रोत्साहित केले. तुझ्या कारकिर्दीत आम्हाला स्टेडियम उभारलेले पाहायचे आहे, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच मी पुन्हा जीसीएच्या अध्यक्षपदावर आहे, असे सूरज लोटलकर म्हणाले. 

हा लोकशाहीचा विजय..
भारतीय लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे. विरोधी पक्षाला आरोप करण्याचे पूर्ण अधिकार असतात. त्यांच्या आरोपांमुळे लोकांच्या मनावर परिणाम होतील असेही नाही. आता निकाल बाहेर आला आहे. क्लबने मला पूर्ण सहकार्य केले आणि म्हणून आम्ही निर्विवाद जिंकून आलो आहे. माझ्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले; मात्र विरोधकांना नियमांचे अर्धवट ज्ञान होते. जीसीएच्या घटनेला सीओएने अ दर्जा दिलेला आहे. या घटनेनुसार मी पदासाठी पात्र होतो याची मला जाण होती. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता मी निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो. यासाठी देसाई-फडके यांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला.

Web Title: Lotlikar group won goa cricket association election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.