महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' का आहे, जाणून घ्या...

दोनवेळचा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीवर विजय आणि पराभवानंतर कधीही भावनांचे ओझे जड झालेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 11:32 PM2019-10-16T23:32:52+5:302019-10-16T23:33:07+5:30

whatsapp join usJoin us
Know why MS Dhoni is 'Captain Cool' ... | महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' का आहे, जाणून घ्या...

महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' का आहे, जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ‘मीदेखील सर्वसाधारण व्यक्ती आहे. सामान्य माणसासारखी माझी विचार करण्याची पद्धत सोपी आहे. तथापि, नकारात्मक विचारांवर नियंत्रण राखण्यात इतरांच्या तुलनेत थोडा वेगळा असल्यामुळे भावनांवर संयम राखतो,’ असे वक्तव्य भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने केले.
शांतचित्त स्वभावामुळेच धोनीची ओळख भारतीय क्रिकेटमध्ये ‘कॅप्टन कूल’ बनली. दोनवेळचा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीवर विजय आणि पराभवानंतर कधीही भावनांचे ओझे जड झालेले नाही. ‘प्रत्येक सामन्यानंतर भावना उचंबळून येतात पण मी त्यावर सहज नियंत्रण राखतो,’ असे धोनीने सांगितले.
जुलैमध्ये विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यापासून धोनीच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली. कुणी माहीच्या निवृत्तीबाबत तर कुणी त्याच्या खेळातील शिथिलतेबाबत बोलत सुटले होते. धोनीने काही काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
विपरीत परिस्थितीवर मात करणारा चाणाक्ष खेळाडू अशी ओळख लाभलेल्या धोनीला खुद्द याबाबत विचारताच तो म्हणाला,‘अन्य कुण्या व्यक्तीप्रमाणे मी देखील निराश होतो. अनेकदा मलाही राग येतो. पण मी कधीही संयम ढळू देत नाही. माझ्या हातून जाणतेपण किंवा अजाणतेपणे चूक होऊ नये, याची काळजी घेतो. कुणी दुखावले जाऊ नये, याचा विचार करतो. समस्यांचे जाळे विणले जावे, असे मला वाटत नाही. त्यामुळेच मी समस्यांवर तोडगा काढण्यावर अधिक विश्वास बाळगतो.’
समस्या सोडविणे माझ्यासाठी उपयुक्त सिद्ध होत असल्याचे सांगून तो पुढे म्हणाला, ‘भावना व्यक्त करण्याआधी त्यातुलनेत आपण वेगळे काय केले पाहिजे, याचा विचार होणे महत्त्वाचे ठरते. पुढील काही वेळेसाठी आणि गोष्टींसाठी डावपेच कसे आखायचे, याचा विचार व्हावा. कुणाच्या पाठिंब्याच्या बळावर मी यशस्वी ठरू शकेन, याचा विचार करणे कधीही उपयुक्त ठरते. कुठल्याही गोष्टींचा परिणाम काय होईल, याचा विचार करताना परिणामासाठी कशी प्रक्रिया राबवावी, हे देखील डोक्यात आणायला हवे. देशाचे नेतृत्व करताना मी नेहमी यावर भर देत राहिलो.’

Web Title: Know why MS Dhoni is 'Captain Cool' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.