IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय

IPL 2021 : नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करत दिल्लीला ८ बाद १४७ धावांवर रोखले. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या ४२ धावांत अर्धा संघ गमावला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:03 AM2021-04-16T07:03:17+5:302021-04-16T07:05:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Miller becomes 'killer', Morris slapped; Rajasthan won by three wickets | IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय

IPL 2021 : मिलर ठरला ‘किलर’, मॉरिसचा तडाखा; राजस्थानचा तीन गड्यांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन

मुंबई : यंदाच्या लिलावात आपल्याला सर्वाधिक किंमत का मिळाली हे दाखवून देताना ख्रिस मॉरिसने अत्यंत दबाच्या स्थितीत तुफानी टोलेबाजी करत राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन गड्यांनी विजयी केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये डेव्हिड मिलरने केलेली ‘किलर’ खेळी दिल्लीला भारी पडली.
नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजी करत दिल्लीला ८ बाद १४७ धावांवर रोखले. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने अवघ्या ४२ धावांत अर्धा संघ गमावला होता. इथून दिल्लीचा विजय दिसत होता, मात्र मिलरने हळूहळू जम बसवताना मोक्याच्या वेळी वेग वाढवत ४३ चेंडूंत ६२ धावा ठोकल्या. संपूर्ण सामन्यात पहिला षटकार त्याच्याच बॅटमधून आला तोही तब्बल १६व्या षटकात. दिल्लीकडून कोणीही षटकार मारला नाही. मिलरनंतर खिंड लढवली ती मॉरिसने. १८ चेंडूंत चार उत्तुंग षटकार ठोकत मॉरिसने दिल्लीच्या हातातील सामना हिसकावला. टॉम करणच्या अखेरच्या षटकात दोन षटकार ठोकत मॉरिसने ‘रॉयल’ विजयावर शिक्का मारला. आवेश खानने ३, तर ख्रिस वोक्स व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्याआधी, राजस्थानच्या हळुवार चेंडूंच्या माऱ्यापुढे दिल्लीचे फलंदाज ढेपाळले. जयदेव उनाडकटने दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावत ४ षटकांत केवळ १५ धावांत ३ खंदे फलंदाज बाद केले. पृथ्वी शॉ व शिखर धवन हे उनाडकटचे शिकार ठरले. यानंतर अजिंक्य रहाणेलाही तंबूची वाट दाखवत उनाडकटने दिल्लीला दबावात आणले. यात भर म्हणजे मुस्तफिझूर रहमानने दिल्लीचा हुकमी अष्टपैलू मार्कस स्टोईनिसला शून्यावर बाद केले. संघाची ही पडझड होत असताना खंबीरपणे उभा राहिलेल्या कर्णधार ॠषभ पंतने ३२ चेंडूंत ५१ धावांसह दिल्लीला बऱ्यापैकी मजल मारून दिली. पदार्पण केलेल्या ललित यादवने (२०) त्याला चांगली साथ दिली. गतीचा अंदाज बांधण्यात चुकल्याने दिल्लीच्या फलंदाजांनी झेल देत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. 

- कर्णधार म्हणून ॠषभ पंतने पहिले अर्धशतक झळकावले.
- पंतने सलामीवीर वगळता सर्वाधिक ११ अर्धशतके ठोकणारा भारतीय फलंदाज असा मान मिळवत श्रेयस अय्यरला (१०) मागे टाकले.
- शिखर धवनने राजस्थानविरुद्ध २० डावांमध्ये ५४६ धावा केल्या असून, यामध्ये सहा अर्धशतकांचा समावेश आहे.
- २०१९ सालापासून आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ सर्वाधिक १५व्यांदा एकेरी धावसंख्येत बाद झाला आहे. दिनेश कार्तिक (१३) दुसऱ्या         स्थानी आहे.

Web Title: IPL 2021: Miller becomes 'killer', Morris slapped; Rajasthan won by three wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.