IPL 2020: ‘नेट गोलंदाज’ म्हणून युवा खेळाडूंना संधी

सीएसके, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स सरावासाठी नेणार अधिक गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:20 AM2020-08-12T01:20:28+5:302020-08-12T01:21:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 Opportunity for young players as net bowlers | IPL 2020: ‘नेट गोलंदाज’ म्हणून युवा खेळाडूंना संधी

IPL 2020: ‘नेट गोलंदाज’ म्हणून युवा खेळाडूंना संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : यंदाची आयपीएल यूएईमध्ये होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर क्रिकेटपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्याच वेळी किमान ५० अशा क्रिकेटपटूंचाही फायदा होणार आहे, ज्यांची ओळख अद्याप क्रिकेटप्रेमींना झालेली नाही. हे सर्व खेळाडू आयपीएल फ्रेंचाईजींसह सराव सत्रातील विशेष नेट गोलंदाज म्हणून प्रवास करण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके), कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांनी आतापर्यंत नेट गोलंदाजांना घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या सराव सत्रातील खेळाडूंमध्ये प्रथम श्रेणी, १९ आणि २३ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेटपटूंचा अधिक समावेश आहे. त्यामुळे यादरम्यान महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर अशा आघाडीच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी या युवा गोलंदाजांना मिळेल.

दुसरीकडे, बीसीसीआयने आयपीएल संघांना आपल्यासह केवळ २४ खेळाडूंना यूएईमध्ये नेण्याची परवानगी दिली आहे. फ्रेंचाईजींसह किती जण प्रवास करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सराव सत्रासाठी साधारणपणे स्थानिक गोलंदाजांचा वापर होतो; मात्र यंदा आयपीएलसाठी केलेल्या जैवसुरक्षा नियमांमुळे सर्व फ्रेंचाईजींना सराव सत्रासाठी अधिक गुणवान गोलंदाजांची व्यवस्था करावी लागेल. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘जर सर्व काही सुरळीत झाले, तर यूएईला सुमारे १० गोलंदाजांना सरावासाठी घेऊन जाण्याची आमची योजना आहे. संघासोबत त्यांचा मुक्काम राहील आणि स्पर्धेला सुरुवात होईपर्यंत ते तिथे राहतील.’ केकेआरनेही नेट गोलंदाज म्हणून १० खेळाडूंची निवड करण्यात येईल, असे स्पष्ट केले. केकेआरच्या सूत्राने सांगितले की, ‘या गोलंदाजांमध्ये रणजीसह १९ आणि २३ वर्षांखालील स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असेल.’ दिल्ली संघ सुमारे ६ युवा गोलंदाजांना सोबत घेऊन जाईल, अशी माहिती मिळाली. दिल्ली संघाच्या सूत्राने माहिती दिली की, ‘हे सर्व गोलंदाज संघासोबत राहतील आणि नेट सरावादरम्यान संघासोबतच प्रवास करतील.’ (वृत्तसंस्था)

बीसीसीआयने एमिरेटस बोर्डाकडे सोपवली मंजुरी
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ सप्टेबर ते १० नोव्हेबर दरम्यान होणाऱ्या आयोजनासाठी भारत सरकारने दिलेली मंजुरी बीसीसीआयने औपचारिकरीत्या एमिरेटस् क्रिकेट बोर्डाच्या स्वाधीन केली. आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी कालच केंद्र शासनाने लेखी मंजुरी बहाल केल्याची माहिती माध्यमांना दिली होती.

एमिरेटस् क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि कबिनेट मंत्री शेख नाहायान मुबारक अल नाहायान यांनी,‘ आम्ही आमच्या पसंतीच्या खेळाची सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करीत असल्याचा आनंद वाटतो. बीसीसीआयने ही मंजुरी आमच्याकडे सोपवली असून ही स्पर्धा संस्मरणीय ठरवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू,’ अशी हमी देतो.

 

Web Title: IPL 2020 Opportunity for young players as net bowlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.