IPL 2019 RR vs DC: Ajinkya Rahane's century, Rajasthan royal's 191 runs | IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा
IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा

जयपूर, आयपीएल 2019: कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यामुळे खांद्यावरील भार हलका झालेल्या अजिंक्य रहाणेनेदिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रहाणेने यंदाच्या मोसमातील पहिले आणि आयपीएलमधले दुसरे शतक झळकावताना राजस्थान रॉयल्सला 6 बाद 191 धावांचा पल्ला गाठून दिला. कर्णधार स्टीव्हन स्मिथने अर्धशतकी खेळी करताना त्याला चांगली साथ दिली. सात वर्षांनंतर रहाणेने आयपीएलमध्ये शतक झळकावले. त्याने 2012मध्ये पहिले शतक झळकावले होते. रहाणेने 63 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 105 धावांवर नाबाद राहिला.  

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि दुसऱ्याच षटकात यजमानांना धक्का बसला. अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांच्यात ताळमेळ न राहिल्याने राजस्थानला सुरुवातीलाच धक्का बसला. सॅमसन ( 0) धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर रहाणे आणि स्टीव्हन स्मिथने राजस्थानचा डाव सावरला. पाचव्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाईन लेगला इशांत शर्माने रहाणेचा झेल सोडला. त्यानंतर रहाणेने खणखणीत षटकार व चौकार खेचला. राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 52 धावा केल्या. रहाणेने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. राजस्थानकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये रहाणेने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. या क्रमवारीत जोस बटरल आघाडीवर आहे. त्याने 29 चेंडूंत मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याविरुद्ध ही खेळी केली. रहाणेच्या जोडीला स्मिथनेही मुक्तपणे फटकेबाजी करण्याचा आस्वाद लुटला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना संघाला 10च्या सरासरीनं धावा करून दिल्या. या दोघांनी 59 चेंडूंत 100 धावांची भागीदारी केली. जयपूरच्या मैदानावरील ही राजस्थानकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली.  दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही कोणत्याही विकेटसाठी झालेली ही मोठी भागीदारी आहे. 2013 सालानंतर प्रथमच जयपूरमध्ये प्रथच शतकी भागीदारी ठरली. रहाणेपाठोपाठ स्मिथनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 31 चेंडूंत अर्धशतक केले. पण, 14व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्मिथ बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ख्रिस मॉरिसनं सीमारेषेवर स्मिथचा झेल टिपला. स्मिथने 32 चेंडूंत 8 चौकारांच्या साथीनं 50 धावा केल्या. 


स्मिथ व रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. राजस्थान रॉयल्सकडून ही चौथी सर्वोत्तम भागीदारी आहे. रहाणे आणि शेन वॉटसन यांनी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 144 धावांची भागीदारी केली होती. स्मिथ बाद झाल्यानंतरही रहाणेची बॅट थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार सुरूच ठेवला. दुसऱ्या बाजूनं बेन स्टोक्स सावध खेळ करत होता. त्याला 8 धावांवर ख्रिस मॉरिसने बाद केले. त्यानंतर आलेला अॅश्टन टर्नर शून्यावर बाद झाला. टर्नरने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम नावावर केला. त्याने सलग पाच डावांत शून्यावर बाद होण्याचा विक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानंतर रहाणेने अखेरपर्यंत खिंड लढवत संघाला मोठा पल्ला गाठून दिला. 


Web Title: IPL 2019 RR vs DC: Ajinkya Rahane's century, Rajasthan royal's 191 runs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.