जयपूर, आयपीएल 2019 : रिषभ पंत नामक वादळासमोर राजस्थान रॉयल्स संघाचा पालापाचोळा झाला... 192 धावांचे लक्ष्य उभे करूनही राजस्थानला सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेटने हार पत्करावी लागली. पंतने 36 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 78 धावांची खेळी केली. पंतच्या या खेळीनंतर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावर पुन्हा चर्चा सुरू झाली. इंग्लंड येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयनं निवडलेल्या 15 सदस्यीय संघात पंतच्या जागी दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आले. निवड समितीच्या या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पंतला वर्ल्ड कप संघात स्थान न देऊन भारतीय संघाने मोठी चूक केल्याचा दावा, पाँटिंगने केला. 


तो म्हणाला,'' वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याचे दुःख काय असते याची मला कल्पना आहे. निवड समितीने जाहीर केलेल्या भारतीय संघातील निवड चुकलेली आहे. इंग्लंडच्या वातावरणात पंतची बॅट चांगलीच तळपली असती आणि भारताच्या मधल्या फळीत पंत हा सक्षम पर्याय असता. तो वर्ल्ड कप संघात असता तर त्याची फटकेबाजी पाहताना आनंद झाला असता. तंदुरुस्ती राखल्यास तो तीन-चार वर्ल्ड कप नक्कीच खेळू शकतो.''

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पंतने 27 चेंडूंत 78 धावांची फटकेबाजी केली होती. त्यानंतर त्याला सातत्या राखता आले नाही. पाँटिंग म्हणाला,''रिषभ पंतसारखा स्फोटक फलंदाज वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात हवा होता. आजच्या सामन्यात त्याच्या आक्रमक फलंदाजीचा आस्वाद घेतला. एकदा लय सापडली की तो आतषबाजीच करतो,'' असे पाँटिंग म्हणाला.


अजिंक्य रहाणेच्या नाबाद 105 धावांच्या खेळीनंतरही राजस्थानला विजयपथावर राहण्यात अपयश आले. शिखर धवनने रचलेल्या मजबूत पायावर पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी विजयाचा कळस चढवला. दिल्ली कॅपिटल्स संघाने 6 विकेट राखून विजय मिळवला. या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले ऑफच्या आशाही संपुष्टात आल्या. दिल्लीने या विजयाबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने प्रथमच ही भरारी घेतली. 
 


Web Title: India wrong to not take Rishabh Pant for World Cup in England: Ricky Ponting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.