India vs West Indies: Virat Kohli ready to break Sir Don Bradman's record | डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज
डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज

जमैका, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता काही दिवसांमध्येच कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीलासर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडायची संधी आहे. पण नेमका कोणता विक्रम कोहली मोडू शकतो, हे जाणून घ्या...

सध्याच्या घडीला कोहलीच्या नावावर 77 कसोटी सामने आहेत. कोहलीने 77 कसोटी सामन्यांमध्ये 6613 धावा केल्या आहेत. ब्रॅडमन यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये 6996 धावा केल्या आहेत. त्यामुळे कोहलीला ब्रॅडमन यांना मागे टाकण्यासाठी 383 धावांची गरज आहे. ब्रॅडमन यांनी आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 29 शतके लगावली आहेत. कोहलीच्या नावावर सध्या 25 शतके आहेत. त्यामुळे या दौऱ्यात ब्रॅडमन यांचा हा विक्रम कोहली मोडू शकणार नाही, पण तो ब्रॅडमन यांची बरोबरी करू शकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

कोहलीने पूर्ण केला 11 वर्षांचा प्रवास, पाहा यामध्ये काय घडले खास
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा अकरा वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे. जे स्वप्न कोहलीने लहानपणी पाहिले होते, ते 11 वर्षांपूर्वी सत्यात उतरले होते. याबाबतचे एक ट्विट कोहलीने केले असून चाहत्यांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

18 ऑगस्ट 2008 हा दिवस कोहलीसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस होता. कारण या दिवशी कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज त्या गोष्टीला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 11 वर्षांमध्ये कोहलीने एकूण 68 शतके लगावली आहेत. 

कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्ध दांबुला येथे एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. पण आपल्या पहिल्याच सामन्यात कोहलीला फक्त 12 धावाच करता आल्या होत्या. कोहलीने पहिले शतक झळकावले ते 2009 साली. पण सध्याच्या घडीला सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 43 शतके लगावली आहेत. आता त्याच्यापुढे फक्त भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीने 25 शतके पूर्ण केली आहेत.

आजच्या दिवसाचे औचित्य साधून कोहलीने 2008 साली जेव्हा पदार्पण केले होते, तेव्हाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर सध्याच्या एक फोटोही त्याने पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये कोहलीने लिहिले आहे की, " या दिवशीच 2008 साली मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. आता या यात्रेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. तुम्हा साऱ्यांनाही योग्य मार्गक्रमण करत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य मिळो."

चाहत्यांनीही विराटच्या या पोस्टला उंदड प्रतिसाद दिला आहे. ' विराटिझ्मची 11 वर्षे' असा हॅशटॅग चाहत्यांनी चालवला आहे. सध्याच्या घडीला कोहली हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने दोन शतके लगावली होती. त्याचबरोबर दहा वर्षांमध्ये 20 हजार धावा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.


Web Title: India vs West Indies: Virat Kohli ready to break Sir Don Bradman's record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.