India vs Pakistan World Cup 2019 india beats pakistan by 89 runs | India Vs Pakistan World Cup 2019: पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम
India Vs Pakistan World Cup 2019: पाकिस्तानला सातव्यांदा लोळवलं, भारताचं वर्चस्व कायम

मँचेस्टर : जागतिक क्रिकेटमधील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात भारतीय संघाने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी लोळवले. यासह भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांचा या स्पर्धेत सलग सातव्यंदा पराभव केला. भारताने ५० षटकात ५ बाद ३३६ धावा उभारल्यानंतर पाकिस्तानचा डाव ४० षटकात ६ बाद २१२ धावांत रोखला गेला. पावसाच्या व्यत्ययानंतर पाकला अखेरच्या ५ षटकात १३६ धावांचे ‘सुधारित’ आव्हान मिळाले होते. मात्र त्यांना केवळ ४६ धावाच करता आल्या. सर्वात महत्त्वाचे या धमाकेदार विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकविरुद्ध झालेल्या पराभवाची व्याजासहीत परतफेडही केली.

पावसामुळे अनेकदा खेळ थांबविण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ४० षटकात ३०२ धावांचे आव्हान मिळाले आणि तेव्हा पाकिस्तानने ३५ षटकात ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. हे आव्हान अवाक्याबाहेरचे ठरल्याने नंतर पाकने विजयाचे सर्व प्रयत्नही सोडले आणि केवळ सामना पूर्ण होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली होती.

धावांचा पाठलाग करताना फखर झमान (६२) आणि बाबर आझम (४८) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. इमाम उल हकला (७) विजय शंकरने बाद केल्यानंतर झमान-आझम यांनी १०४ धावांची भागीदारी केली. परंतु, यानंतर पाकिस्तानने ४८ धावांत ५ फलंदाज गमावले आणि सामना भारताच्या बाजूने झुकला. कुलदीप यादवने पाकचे कंबरडे मोडताना आझम आणि झमान यांना पाठोपाठच्या षटकात बाद केले. हार्दिक पांड्याने यावर आणखी कहर करताना मोहम्मद हाफीझ (९) आणि शोएब मलिक (०) या अनुभवी फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. येथेच भारताचा विजय निश्चित झाला.

तत्पूर्वी, ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर नाणेफेक जिंकून पाक कर्णधार सर्फराझ अहमदने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हवामान पाहताना गोलंदाजास मदत मिळेल अशी शक्यता होती. त्यात पहिले षटक निर्धाव गेल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वासही उंचावला. मात्र यानंतर रोहितने आपला सर्व अनुभव पणास लावताना हळूहळू खेळपट्टीचा अंदाज घेत भारताच्या डावाला आकार दिला.

सलामीला आलेल्या लोकेश राहुल सुरुवातीला दडपणाखाली दिसला. मात्र त्याने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत रोहितला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला. रोहितने भारताला मजबूत स्थितीत आणताना ११३ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांसह १४० धावांची तडाखेबंद खेळी केली. दुसरीकडे राहुलनेही ७८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा फटकावल्या.

दोघांनी १३६ धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र, २४व्या षटकात वहाब रियाझने राहुलला बाद केले. यानंतर कर्णधार कोहलीने रोहितसह दुसऱ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. यावेळी सर्वांना वेध लागले होते, ते रोहितच्या द्विशतकाचे. फॉर्म पाहता रोहित पुन्हा एकदा द्विशतक झळकावणार अशी सर्वांचीच खात्री होती. मात्र, ३९व्या षटकात हसन अलीच्या चेंडूवर फाईन लेगला फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. परंतु, कोहलीने भारताच्या धावगतीवर परिणाम होऊ दिला नाही. त्याने ६५ चेंडूत ७ चौकारांसह ७७ धावा केल्या. यादरम्यान कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील ११ हजार धावांचा टप्पाही पार केला.

पावसाने हजेरी लावलीच
पावसाचा धोका असलेल्या या सामन्यात अखेर पावसाने हजेरी लावलीच. ४६.४ षटकांचा खेळ झालेला असताना पावसामुळे सामना काहीवेळ थांबविण्यात आला. यावेळी, कोहली आणि विजय शंकर खेळपट्टीवर होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा सामना सुरु झाला. मात्र त्यानंतर भारताला अपेक्षित धावा फटकावता आल्या नाही.

विश्वचषक रेकॉर्ड
सर्वात कमी डावांत २४ शतक पूर्ण करणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. त्याने यासाठी २०३ डाव खेळले असून, द. आफ्रिकेच्या हाशिम आमलाने १४२ डावांत २४ शतके झळकावली आहेत. विराट कोहली १६१ डावांसह दुसºया स्थानी आहे.

रोहितचे विक्रम
रोहित शर्माने कारकिर्दीतील 24वे एकदिवसीय शतक झळकावले.
रोहित शर्माने सलग पाचव्या सामन्यात 50हून अधिक धावांची खेळी केली.
विश्वचषकात पाकविरुद्ध शतक ठोकणारा रोहित केवळ दुसरा भारतीय ठरला. या आधी २०१५ साली कोहलीने शतक केले होते.
भारताकडून सर्वाधिक षटकारांचा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडताना रोहितने आतापर्यंत ३५८ षटकार मारले. धोनीच्या नावावर ३५५ षटकारांची नोंद.
पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सामन्यात भारतीय फलंदाजाकडून सर्वोच्च धावा. यापूर्वी २०१५ मध्ये विराटने १०७ धावा काढल्या होत्या.
यापूर्वीच्या सलग पाच एकदिवसीय सामन्यात रोहितने ९५,५६,१२२(नाबाद), ५७, १४० अशा धावा केल्या आहेत. सलग पाच सामन्यात ५० हून अधिक धावा करणारा तो केवळ पाचवा भारतीय ठरला.
पाकिस्तानविरुद्ध सलग दोन शतके झळकावणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला. २०१८ मध्ये आशिया चषक समान्यात त्याने नाबाद १११ धावा केल्या होत्या.
लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी केलेली १३६ धावांची भागीदारी पाकिस्तानविरुद्धची विश्वचषक स्पर्धेतील आजपर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली. यापूर्वी सचिन व सिद्धू यांनी १९९६ मध्ये ९० धावांची भागीदारी केली होती.
विश्वचषक स्पर्धेत रोहितची पाकिस्तानविरुद्धची दुसºया क्रमांकाची सर्वोत्तम खेळी. यापूर्वी अ‍ॅँड्रयू सायमंड्सने २००३ मध्ये नाबाद १४३ धावा फटकावल्या होत्या.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाºया भारतीय खेळाडूंमध्ये रोहितने शिखर धवनची बरोबरी केली. दोघांनीही चार शतके केली आहेत.

राहुल-रोहितचे ‘पुरे सौ...’
रोहित आणि राहुल यांनी विश्वचषकात पहिल्यांदाच भारतीय संघाची सुरुवात केली. रोहितला दोन वेळा जीवदान मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा उठवत रोहितने शतक पूर्ण केले. दोघांनी १०७ चेंडूंत भारताचे शतक साजरे केले होते. यामध्ये रोहितने ६०, तर राहुलने ३२ धावांचे योगदान दिले. १७.३ षटकांत भारताने बिनबाद १०० धावा केल्या होत्या.

यंदाच्या विश्वचषकातील वेगवान शतक
रोहितने या विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकाविले. त्याने अवघ्या ८५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. पाकविरुद्ध वेगवान शतक झळकाविणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. या शतकानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मोठा जल्लोष पसरला होता. प्रत्येक खेळाडू उभा राहून रोहितचे अभिनंदन करीत होता. रोहितने यंदाच्या स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितचे हे पाकविरुद्धचे दुसरे आणि वैयक्तिक २४ वे शतक आहे. तेंडुलकर, गांगुली व धवननंतर विश्वचषकात किमान तीन शतके करणारा रोहित चौथा फलंदाज ठरला.

असा झाला रोहित बाद
हसन अली टाकत असलेल्या ३९व्या षटकाच्या दुसºया चेंडूवर रोहितने फाइन लेगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शॉर्ट फाइन लेगला उभ्या असलेल्या रियाझच्या हाती सरळ झेल गेला. रोहितचा हा प्रयत्न फसला. चांगल्या लयीत असताना विनाकारण खराब फटका खेळल्याचे लक्षात आल्यानंतर रोहित निराश झाला. निराश चेहºयाने तो पॅव्हेलियनकडे परतला.

पहिले षटक निर्धाव
सलामीला आलेल्या राहुलवर थोडा दबाव दिसला. त्याने आमीरचे पहिले षटक संयमाने निर्धाव खेळले. दुसरीकडे, चेंडू स्विंग होत असल्याने आमिर खूश झाला. या विश्वचषकात भारताविरुद्ध पहिले षटक निर्धाव जाण्याची ही पहिली वेळ होती.

संक्षिप्त धावफलक :
भारत : ५० षटकात ५ बाद ३३६ धावा (रोहित शर्मा १४०, विराट कोहली ७७, लोकेश राहुल ५७; मोहम्मद आमिर ३/४७.) वि.वि. पाकिस्तान : ४० षटकात ६ बाद २१२ धावा (फखर झमान ६२, बाबर आझम ४८; विजय शंकर २/२२, कुलदीप यादव २/३२, हार्दिक पांड्या २/४४.)
 


Web Title: India vs Pakistan World Cup 2019 india beats pakistan by 89 runs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.