India vs Bangladesh, 2nd T20I : 'महा' नव्हे, तर रोहित शर्माचं चक्रीवादळ घोंगावलं, टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:20 PM2019-11-07T22:20:09+5:302019-11-07T22:21:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 2nd T20I : Hitman Rohit Sharma's Show; Team India beat Bangladesh by 8 wickets, equal series 1-1 | India vs Bangladesh, 2nd T20I : 'महा' नव्हे, तर रोहित शर्माचं चक्रीवादळ घोंगावलं, टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

India vs Bangladesh, 2nd T20I : 'महा' नव्हे, तर रोहित शर्माचं चक्रीवादळ घोंगावलं, टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी जोरदार फटकेबाजी करताना भारताला सहज विजय मिळवून दिला. भारतानं या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या सामन्यात 'महा' चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण वादळ आणलं ते रोहितनं... त्याच्या दमदार फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांना पालापाचोळ्यासारखं भिरकावून दिलं. 


या सामन्यात रिषभ पंतकडून अजाणतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतची एक चूक महागात पडली. 

सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.


वॉशिंग्टन सूंदरनं भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानं मोहम्मद नईमला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. नईमने 31 चेंडूंत 5 चौकारांसह 36 धावा केल्या. त्यानंतर चहलने 13व्या षटकात बांगलादेशच्या दोन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. मुश्फिकर रहिम ( 4) आणि सौम्या सरकार ( 30) एकाच षटकात बाद झाले. 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. त्यानंतर महमदुल्लाहनं 21 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीनं 30 धावा केल्या. दीपक चहरनं त्याला बाद केलं. बांगलादेशला 6 बाद 153 धावा करता आल्या.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद 63 धावा केल्या. त्यातील 46 धावा या एकट्या रोहितनं केल्या होत्या. रोहितनं 23 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. रोहित-धवननं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 11वेळा अर्धशतकी भागीदारी केली. या कामगिरीसह त्यांनी मार्टिन गुप्तील व केन विलियम्सन ( न्यूझीलंड) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 
बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहितनं ( 380+) स्वतःच्या नावावर केला. तसेच रोहितनं विराट कोहलीच्या 22 अर्धशतकांशीही बरोबरी केली. रोहित व शिखरची भागीदारी 118 धावांत संपुष्टात आली. धवन 27 चेंडूंत 4 चौकारांसह 31 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रोहितला पाचव्या ट्वेंटी-20 शतकानं हुलकावणी दिली. रोहित 43 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून 85 धावा करून माघारी फिरला. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताने हा सामना 8 विकेट राखून जिंकला. 




Web Title: India vs Bangladesh, 2nd T20I : Hitman Rohit Sharma's Show; Team India beat Bangladesh by 8 wickets, equal series 1-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.