- स्वदेश घाणेकर
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८-१९ चा ऑस्ट्रेलिया मालिका विजय की २०२०-२१च्या मालिकेतील देदिप्यमान यश, या दोघांची तुलना कराल तर पारडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या टीम इंडियाच्या बाजूने झुकलेले पाहायला मिळेल. या मताशी काही जणं उघड सहमत नसतील, पण त्यांनाही या मालिकेत टीम इंडियाने कोणकोणत्या संकटांचा  सामना केलाय याची जाण असेल. इथे विराटच्या नेतृत्वाखालील यशाचं महत्व अजिबात कमी करायचे नाही, पण अजिंक्यच्या  नेतृत्व कौशल्याकडे डोळेझाक करूनही चालणार नाही. आक्रमकता ही उगाच हातवारे करून, आक्रस्ताळीपणातून, स्लेजिंग करूनच दिसते अशा पायंडा पडलेल्या प्रथेला अजिंक्यने फाटा दिला. तुम्हाला इथे विशेष सांगायला आवडेल की, अजिंक्य हा पूर्वीचा ज्युदोपटू.. या खेळात आक्रमकता नसेल तर निभाव लागणे अवघड, पण अजिंक्य या खेळातही तरबेज. क्रिकेटच्या मैदानावर मात्र अजिंक्यची देहबोली ही परस्परविरोधी. काही वर्षांपूर्वी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतील अजिंक्यला त्याच्या याच स्वभावाविषयी विचारले होते. तेव्हा तो म्हणाला होता की, ''आक्रमकता ही बुद्धीनेही दाखवली जाऊ शकते. त्यासाठी उगाच हातवारे किंवा विशेष हावभाव करायलाच हवा असे नाही.'' ही संपूर्ण मालिका पाहताना त्याचे हे बोलणे वारंवार समोर येत होते. 


युद्ध सुरू असताना आपले ऐकेक प्रमुख सहकारी जायबंदी होत असतानाही सेनापतीने खचून न जाता हाताशी असलेल्या सहकाऱ्यांसह अखेरच्या श्वासापर्यंत ते लढायचे असते, हेच अजिंक्यने केले. सौरव गांगुलीनं टीम इंडियाला आरे ला कारे करणे शिकवले. त्याचा वारसा विराट कोहलीनं पुढे चालवला. अजित वाडेकर यांनी टीम इंडियाला परदेशात सर्वप्रथम यश मिळवून दिले. तेही शांत व संयमी होते. अजिंक्यही याच पठडीतला. ऐरवी आपण विराटला आक्रमक कर्णधार समजत होतो आणि याचे मूल्यांकन त्याच्या फलंदाजीतून व देहबोलीवरून केले गेले. पण, अजिंक्य त्यापेक्षाही आक्रमक कर्णधार आहे. त्याची आक्रमकता ही न दिसणारी पण अत्यंत प्रभावी आहे. शांत, संयमी, नम्र असणारा अजिंक्य हा आक्रमक?, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. पण, त्याने  या मालिकेत ते दाखवून दिले. ती देहबोलीतून नव्हे तर 'माईंड गेम'मधून दिसली आणि त्याचा रिझल्टही मिळाला. 


इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार हे ऑस्ट्रेलिया मालिकेत येणार नाही याची कल्पना आधीच होती, पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली मायदेशी परतणार हेही माहीत होते. त्यासाठी टीम इंडियाकडे प्लान B तयार होता. पण या मालिकेत अशा काही अनपेक्षित अनप्लान गोष्टी घडल्या आणि टीम इंडियाला ABCD गिरवावी लागली... त्यात पहिल्याच कसोटीत '३६' च्या आकड्याने टीम इंडियाला आकडी आणली. जिव्हारी लागलेल्या या पराभवाची आठवणही करावीशी वाटत नाही... पण, इथूनच अजिंक्यच्या नेतृत्वाची कसोटी सुरू झाली. विराट मायदेशात परतणार आणि मनानं खचलेल्या खेळाडूंसह मैदानावर उतरावे लागणार, या विचारानेच कुणीही अर्धी लढाई हरेल. त्यात मोहम्मद शमीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अडचणीत भर पडली. अजिंक्यने यासाठी आधी स्वतःला तयार केले आणि संघातील प्रत्येकाशी संवाद साधून त्यांना जबाबदारीची जाण करून दिली. 


अजिंक्यने त्या जबाबदारीची सुरुवात स्वतःपासून केली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्याने सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवला. त्यातही उमेश यादवच्या दुखापतीनं अजिंक्यच टेंशन वाढवलं होत. पण तो खचला नाही, तर संघाला विजय मिळवून देत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टीम इंडियातील प्रत्येकासाठी गमावलेला विश्वास परत मिळवण्यासाठी हा विजय पुरेसा ठरला. कर्णधार हा संघाची ओळख असतो. अजिंक्यने स्वतः एक उदाहरण सेट करून सहकाऱ्यांचे मनोबल उंचावले. अजिंक्यसमोरील अडचणी इथेच कमी होणाऱ्या नव्हत्या. मेलबर्नवरील  पराभवानं खवळलेल्या ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियाचं खच्चीकरण करण्यासाठी एक डाव खेळला. रोहित शर्मा, शुबमन गिल, पृथ्वी शॉ, रिषभ पंत आणि शार्दूल ठाकूर यांनी त्यांना आयतं कोलीत दिलं.. भारतीय खेळाडूंनी बायो बबल नियम मोडली ही बोंब ठोकली गेली आणि रोहित तिसऱ्या कसोटी खेळता कामा नये यासाठी प्रयत्न झाले. तेव्हाही अजिंक्यने ठाम मत मांडले "मालिकेत आघाडी घेण्याचा आमचा निर्धार आहे. मैदानाबाहेरील चर्चांचा त्यावर तीळमात्र फरक पडणार नाही." 


हेही प्रयत्न फसले म्हणून की काय ऑसी फॅन्सनी वर्णद्वेषी शेरेबाजी करून भारतीय खेळाडूंचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर यांना त्यांनी टार्गेट केले. याही वेळेस अजिंक्य त्यांच्या बाजूनं खंबीरपणे उभा राहिला. सिडनीत सिराजनं तक्रार करताच हुल्लडबाज प्रेक्षकांवर कारवाई होईपर्यंत, अजिंक्यनं सामना थांबवला. तत्पूर्वी, रवींद्र जडेजामुळे तो धावबाद झाला होता आणि त्याहीवेळेस अजिंक्य जडेजाजवळ गेला अन् मी बाद झालो हे विसर आणि तुझा खेळ कर असला सल्ला देऊन पेव्हेलियनमध्ये परतला. हेच जेव्हा पहिल्या कसोटीत अजिंक्यमुळे विराट कोहलीला धावबाद व्हावे लागले होते, तेव्हा विराटची काय रिअॅक्शन होती ते आठवा. कर्णधार अजिंक्यनं खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवला आणि संकटांचा सामना केला. 


कर्णधाराचा हा विश्वास आर अश्विन आणि हनुमा विहारीनं सार्थ ठरवला. याही सामन्यात दुखापतीन टीम इंडियाला सतावले. धाव घेताना विहारीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. तरीही तो खेळपट्टीवर ठाण मांडून बसला. आर अश्विननेही ऑसी गोलंदाजांचे मारे अंगावर झेलून विहारीसह तब्बल ४२ षटकं खेळून काढली आणि सामना अनिर्णित राखला. कसोटी क्रिकेट म्हणजे बोरींग असे म्हणणाऱ्यांनाही या दोघांनी कौतुक करण्यास भाग पाडले. रवींद्र जडेजा अंगठ्याला बँडेड लावून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. फ्रॅक्चर अंगठ्यानेही फलंदाजीला येण्याची त्याची तयारी होती, परंतु त्याची गरज पडली नाही. या सामन्यात अजिंक्यच अपयशी ठरला. मात्र त्याने नॅथन लियॉनसमोर रिषभ पंतला प्रमोशन देण्याचा डाव खेळला आणि तो सफल झाला. रिषभच्या ९७ धावांच्या खेळीनं सामना भारताच्या बाजूने झुकला होता आणि त्यामुळे मानसिक दडपण कमी झाले. पंत व चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर सुरू झाली सामना वाचवण्याची धडपड. अश्विन व विहारी यांनी जो खेळ केला त्याला दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. अश्विनला स्वतःच्या बुटाची लेस बांधण्यासाठी वाकता येत नव्हते. त्यामुळेच तो ड्रेसिंगरुममध्ये पॅड, ग्लोज घालून उभाच होता. बसलो की उठणे अवघड जाईल याची कल्पना त्याला होती. अशातही त्याने आणि जायबंदी विहारीने ४२ षटकं खेळली आणि भारताच पराभव टाळला. तेव्हा अजिंक्यनं सामन्यानंतर अश्विन व विहारी यांना मारलेली मिठी आजही डोळ्यासमोर ताजी आहे. 


मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी अजिंक्यने सर्वांना ड्रेसिंगरूममध्ये बोलावले. "आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. यश आलेच तर उत्तम, पण न लढता हार मानण्यापेक्षा प्रयत्न करा, झोकून खेळा!", त्याच्या या वाक्याने भारतीय खेळाडूंना बळ दिले. अश्विन व जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटीतून बाहेर झाले. या धक्क्यानंतर तरी अजिंक्य व टीम इंडिया खचेल... उलट संघ अधिक मजबूतीनं उभा राहिला. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांचा एकूण कसोटी अनुभव चार सामन्यांचा, त्यात टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पणाची संधी देण्यात आले. अजिंक्य हा गोलंदाजांचा कर्णधार आहे, असे मेलबर्न कसोटीपूर्वी आर अश्विन म्हणाला होता. त्याच्या वाक्याचा अर्थ गॅबा कसोटीतून उमगला. प्रमुख गोलंदाज नसूनही युवकांनी ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावांत सर्वबाद केले. ३२ वर्षांत केवळ तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियावर ही नामुष्की ओढावली. 


गॅबावरही टीम इंडियाची लढाऊ वृत्ती दिसली. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांच्या दमदार खेळीनं टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला. दुसऱ्या डावातील चेतेश्वर पुजाराचा दृढनिश्चय तोडण्यासाठी ऑसी गोलंदाजांनी त्याला जायबंदी करण्याची खेळी खेळली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. १९७६ साली अंशुमन गायकवाड आणि मोहिंदर अमरनाथ यांनी अंगावर चेंडू झेलत अशी झुंजार खेळी केली होती. त्याची आठवण पुजारा ने चौथ्या कसोटीतल्या शेवटच्या खेळीने करून दिली. कसोटी सामना ट्वेंटी-20 सारखा रंजक होऊ शकतो हे या मालिकेने सिद्ध केले. भारतीय संघ ३६ धावांवर ऑल आऊट झाला होता आणि तीन दिवसात मॅच संपली. त्यानंतर हा जखमी भारतीय संघ पाच वेळा इनिंगमध्ये १०० पेक्षा जास्त ओव्हर्स खेळला. टीम इंडियानं अशक्य वाटणारा सामना जिंकून इतिहास घडवला. अजिंक्यच्या नेतृत्वाखालील कसोटीतील अपराजित मालिका कायम राहिली आणि या नव्या भारतीय संघानं जगासमोर देशाची मान उंचावली. 

केरी पॅकर सर्कसची करून दिली आठवण!
१९७७ आणि १९७९ या कावावधीत केरी पॅकर ( Kerry Packer) यांनी वर्ल्ड क्रिकेट सीरिज आणली. त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे सारे स्टार खेळाडू खेळले होते. त्याच काळात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आली होती आणि ४१ वर्षीय बॉब सिम्पसन यांनी ऑसी संघाचे नेतृत्व सांभाळले होते. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्या मालिकेत ऑस्ट्रेलिया जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते, परंतु ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली होती. 

अजिंक्यनं खेळलेले ट्रम्प कार्ड!
मोहम्मद सिराज -
आयपीएलमधील जबाबदारी पार पाडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा गोलंदाज टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला. येथे पोहोचताच त्याला धक्का देऊन येणारी बातमी धडकली आणि ती म्हणजे वडिलांच्या निधनाची. ज्या वडिलांनी रिक्षा चालवून मुलाच्या क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खाल्ला, तेच हे जग सोडून गेले होते. हा धक्का एखाद्याला कोसळवण्यासाठी पुरेसा होता, परंतु सिराजनं टीम इंडियासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मायदेशात असलेल्या आईशी फोनवर बोलला आणि आईनं त्याला वडिलांचे स्वप्न पूर्ण कर, जास्त विचार करू नकोस, हा सल्ला दिला. मेलबर्न कसोटीत पदार्पणात विकेट घेतल्यानंतर सिराज आकाशाकडे दोन्ही हात उंचावून वडिलांना अभिवादन करताना दिसला. गॅबा कसोटीत पाच विकेट्स घेऊन त्यानं अनेक विक्रम नोंदवले. मुलानं टीम इंडियाकडून खेळावे, हे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले, परंतु ते पाहण्यासाठी तेच जीवंत नाहीत. हे दुःख सिराज लपवू शकत नव्हता. त्यामुळेच आज अब्बा असते तर सर्वात जास्त तेच आनंदी असते, असे तो म्हणाला.

हनुमा विहारी - खराब फॉर्माशी झगडत असूनही अजिंक्यनं विहारीला संघात कायम ठेवले. विहारीवर अजिंक्यचा इतका विश्वास का? हेच कुणाला कळत नव्हते. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या इनिंगपूर्वी पाच डावांत त्यानं केवळ ४९ धावा केल्या होत्या. तरीही त्याचे संघात असणे  खटकणारे होते. पण, सिडनीच्या दुसऱ्या डावात त्याचे उत्तर सर्वांना मिळाले. प्रथम श्रेणी क्रिकेटचा दाणगा अनुभव असणाऱ्या विहारीच्या नावावर २१ शतकं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्यानं १ शतक व ४ अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे संघ अडचणीत असताना नेमकं कसं खेळावं, याचा अनुभव त्याच्याकडे होता आणि तोच कामी आला. सिडनी कसोटीत १६१ चेंडूंत केवळ २३ धावा करून त्यानं अश्विनसह ४२ षटकं खेळून टीम इंडियाचा पराभव टाळला. जायबंदी असूनही तो खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. 

शार्दूल ठाकूर - २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत अवघी १० चेंडू टाकून शार्दूलला दुखापतीमुळे माघारी परतावे लागले होते. तीन वर्षांनंतर नशीबानं त्याला कसोटी पुनरागमनाची संधी मिळाली आणि तीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात... प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची हीच ती संधी, हे शार्दूलनं हेरलं. रोहित शर्मा, अजिंक्य वेळोवेळी त्याला मार्गदर्शन करतच होते. त्यानं गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही आपला दम दाखवला. गॅबा कसोटीत ७ विकेट्स, ६०+ धावा आणि तीन झेल अशी उल्लेखनीय कामगिरी केली. एका कसोटीत अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला. 

टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर - आर अश्विन व जसप्रीत बुमराह जायबंदी झाल्यामुळे या दोघांनाही पदार्पणाची संधी मिळाली. नटराजनसाठी हा दौरा अविस्मरणीय ठरला. एकाच दौऱ्यात ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटीत पदार्पण करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या नटराजननं आयपीएलमध्ये यॉर्कर किंगचा किताब मिळवला. ६०-६५ यॉर्कर तर त्याने असेच टाकले. गॅबा कसोटीत त्याला मार्नस लाबुशेन,  मॅथ्यू वेड व जोश हेझलवूड यांची विकेट मिळाली. हा अनुभव त्याला पुढील वाटचालीसाठी नेहमी कामी येईल. वॉशिंग्टन सुंदरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली होती. पण, तो पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांचा घामटा काढेल, याचा विचार कुणी केलाच नसावा. शार्दूलसह सॉलीड भागीदारी करताना त्यानं टीम इंडियाला पराभवाच्या छायेपासून दूर नेले. गोलंदाजीतही कमाल दाखवताना त्यानं चार विकेट्स घेतल्या.

या सर्वात एका व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आणि ते म्हणजे गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण यांचं... या संपूर्ण दौऱ्यावर ऐकेक प्रमुख गोलंदाज जायबंदी होत असताना अरुण यांनी युवा गोलंदाजांवर घेतलेली मेहनत दिसून आली. त्यांनी या युवकांना योग्य मार्गदर्शन दिले आणि त्याचा रिझल्ट पाहायला मिळाला.  २०१८-१९च्या दौऱ्यात स्टीव्ह स्मिथ व डेव्डिड वॉर्नर नव्हते, म्हणून टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला, अशी चर्चा सुरू होती. पण, या दौऱ्यात हे दोघेही होते आणि शिवाय टीम इंडियाचे निम्मे प्रमुख शिलेदार जायबंदी झाले. निम्म्या संघानं टीम इंडिया या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाशी भिडली आणि जिगरबाज कामगिरी करून दाखवली, म्हणून २०२०-२१ची मालिका ही संस्मरणीय ठरते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia Test : From 36 all out to breaching the Gabba after 32 years, this is the new India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.