India is not a strong contender for the World Cup - Ravi Shastri | भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार नाही; रवी शास्त्रींचा घरचा अहेर
भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार नाही; रवी शास्त्रींचा घरचा अहेर

मुंबई : आपला संघ जेतेपद कसा पटकावेल, याचा विचार कर्णधार आणि प्रशिक्षक करत असतात. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक विधान करत आपल्या संघालाच घरचा अहेर दिला आहे. यंदाच्या विश्वचषकासाठी भारत नाही तर दुसरा एक देश प्रबळ दावेदार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले आहे.

विश्वचषकाला जाण्यापूर्वी प्रशिक्षक संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत असतो. खेळाडूंच्या तांत्रिक गोष्टींपेक्षा त्यांची मानसीकता कधी सुधारेल, सकारात्मक कशी होईल, असा प्रयत्न प्रशिक्षक करत असतात. पण भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी तारे तोडल्याचे मत चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. भारतीय संघाच्या निवडीच्यावेळीही शास्त्री हजर नव्हते. निवड समिती सदस्य आणि कर्णधार विराट कोहली यांनी एकत्र येऊन विश्वचषकाच्या संघाची निवड केली. पण यावेळी शास्त्री नेमके कुठे होते, हा सवाल चाहत्यांना पडला आहे.

विश्वचषकाबद्दल शास्त्री म्हणाले की, " यंदाच्या विश्वचषकासाठी इंग्लंड हा प्रबळ दावेदार आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये इंग्लंडने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, त्याचबरोबर त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजीही बळकट आहे. त्यामुळे विश्वचषक सुरु होण्यापूर्वी इंग्लंड हे विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असतील."

पंधरा सदस्यीय भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) 
बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिका
रविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंड
रविवार 16 जून 2019 : पाकिस्तान
शनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिज
रविवार 30 जून 2019: इंग्लंड
 मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश
 शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका

वर्ल्ड कपच्या या संघात रिषभ पंत आणि अंबाती रायुडू नसल्याने बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली. पण आता पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताच्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत. भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू 2019च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.

भारताच्या पंधरा सदस्यीत संभाव्य संघात पंत आणि रायुडू यांचे नाव नाही, पण तरीही त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. कारण निवड समितीने काही राखीव खेळाडू विश्वचषकासाठी ठेवले आहेत. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर हे राखीव खेळाडू भारतीय संघातून खेळू शकतील. या राखीव खेळाडूंमध्ये पंत आणि रायुडू यांचा समावेश करण्यात आला आहे.


Web Title: India is not a strong contender for the World Cup - Ravi Shastri
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.