कटक : शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्या पुनरागमनामुळे बलाढ्य बनलेला गत चॅम्पियन भारतीय संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याद्वारे पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारतात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीला वेग देणार आहे. विश्वचषकाआधी भारत दहा टी-२० सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने आटोपल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर विश्वचषकात भारताचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध होईल.
या दोन्ही मालिकांचा उद्देश स्पष्ट असेल. विश्वचषकाआधी खेळाडूंची भूमिका निश्चित करणे आणि उपयुक्त संयोजन तयार करण्यावर भर असेल. मागच्या वर्षी विश्वचषक जिंकल्यापासून भारताने दमदार कामगिरी केली आहे. विश्वचषकात सलग आठ आणि एकूण २६ सामने जिंकले. यात आशिया चषकातील सलग सात विजयांचाही समावेश आहे. या काळात भारताने केवळ चार सामने गमावले. तथापि, एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. भारताने टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ज्या द. आफ्रिकेला नमविले, त्याच संघाविरुद्ध आणखी यशस्वी कामगिरी करण्याचे लक्ष्य आखले आहे.
शुभमन गिल सज्ज
मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर भारताचा टी-२० उपकर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
बंगळुरूतील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (सीओई) केलेल्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर गिल दुखापतीतून सावरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळण्यासाठी ‘सीओई’ने गिलला परवानगी दिली आहे.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्वीपचा फटका मारताना गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला गुवाहाटीतला दुसरा कसोटी सामना आणि त्यानंतरची एकदिवसीय सामन्यांची मालिका गमवावी लागली.
गिलने ‘बीसीसीआय टीव्ही’शी संवाद साधताना सांगितले की, ‘मला आता खूपच बरे वाटत आहे. येथे येण्याच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मी अनेक कौशल्यविकास आणि सराव सत्रांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे आता मी पूर्णपणे तयार असल्यासारखे वाटते.’
हार्दिकच्या समावेशामुळे अनेक पर्याय मिळतात : सूर्यकुमार
‘अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे आशिया चषक जिंकताना संघाने अवलंबलेली रणनीती आणि संतुलन पुन्हा प्रस्थापित होईल. त्याने सुरुवातीच्या षटकांत गोलंदाजी केल्याने संघाला अनेक पर्याय मिळतात’, असे भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले. हार्दिक डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे एशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नव्हता. यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले.
पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिकचे योग्य वेळी झालेले पुनरागमन संघासाठी दिलासादायक मानले जात आहे. नव्या चेंडूने हुशारीने गोलंदाजी करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे भारताला तीन किंवा चार फिरकीपटूंसह खेळण्याची संधी मिळते. सूर्यकुमार म्हणाला की, ‘मला वाटते तुम्ही आशिया चषकामध्येही पाहिले असेल की, जेव्हा हार्दिक नव्या चेंडूने गोलंदाजी करत होता, तेव्हा अंतिम संघासाठी आम्हाला अनेक पर्याय आणि नवे संयोजन आजमावण्याची संधी मिळत होती. तो संघाला पर्यायांसह संतुलनही देतो. मोठ्या सामन्यांत आणि आयसीसी स्पर्धांमध्ये त्याचे प्रदर्शन आणखी उत्कृष्ट होते. हा अनुभव खूप मोलाचा ठरतो. त्याच्यामुळे संघाला निश्चितपणे चांगले संतुलन मिळते.’
हार्दिक एक दिवस आधी कटक येथे पोहोचला होता आणि बाराबती स्टेडियमवर त्याने स्वतंत्र सरावही केला. सोमवारी त्याने ऐच्छिक सराव सत्रात भाग घेतला नसला तरी सूर्याने स्पष्ट केले की, हार्दिक आणि मानेच्या दुखापतीतून सावरलेला शुभमन गिल निवडीसाठी पूर्णपणे उपलब्ध आहेत. ‘सध्या दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहेत’, असे सूर्यकुमार म्हणाला.
विश्वचषकाची सुरुवात आधीच सुरू झाली!
भारतासाठी हा सामना फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वीची सुरुवात आहे. पण, सूर्यकुमारच्या मते, या विश्वचषकाची तयारी खूप आधीच सुरू झाली होती. तो म्हणाला, ‘२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच झाली. तेव्हापासून आम्ही सतत नवे प्रयोग करत आहोत आणि सगळे काही आमच्या बाजूने चालले आहे.’ भारताच्या अलीकडील यशाबाबत सूर्यकुमारने निवड प्रक्रियेतील सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या पाच-सहा मालिकांमध्ये आम्ही एकसारख्या संयोजनासह खेळलो आहोत. आम्ही जास्त बदल केले नाहीत.
सॅमसन की जितेश?
यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात चढाओढ आहे. सॅमसनने ऑस्ट्रेलियात केवळ एकच सामना खेळला, तर जितेशला तीन सामन्यांत संधी देण्यात आली होती. सॅमसनची जमेची बाब अशी की, त्याने सलामीवीर या नात्याने तीन शतके झळकावली आहेत. गिल हा उपकर्णधार असल्याने सॅमसन टी-२० त तळाच्या स्थानावर खेळण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी आनंदाची बाब ही की, मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक फायनलनंतर बाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्खियाचे संघात पुनरागमन झाले आहे. मार्को यान्सेन उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून वाटचाल करीत आहे. स्टार फलंदाज टोनी डी जॉर्जी आणि युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका हे जखमेमुळे संघाबाहेर झाले.