Setback to Team India, IND vs SA: कसोटी मालिकेत २-०ने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर वनडे मालिकेत २-१ने विजय मिळवला. विराट कोहलीची दोन शतके, यशस्वी जैस्वालचे शतक आणि रोहित शर्माची दोन अर्धशतके यांच्या बळावर भारतीय फलंदाजांनी संपूर्ण मालिकेवर वर्चस्व गाजवले. मालिकेतील पहिले दोन सामने १-१ असे बरोबरीत सुटले. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २७० धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालचे धमाकेदार शतक आणि रोहित शर्मा-विराट कोहलीची झंजावाती अर्धशतके यामुळे भारतीय संघाला सहज विजय मिळवता आला. आपल्या आवडत्या फलंदाजांनी केलेल्या बड्या खेळीमुळे चाहतेही खुश झाले. पण टीम इंडिया ICCकडून एक धक्का बसला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली, पण आता त्यांना मोठा दणका बसला. आयसीसीने टीम इंडियाला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले आहे आणि शिक्षा ठोठवली आहे. भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी शिक्षा झाली आहे. रायपूरमध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडिया हरली. ३५८ धावा करूनही संघाला सामना गमवावा लागला आणि या सामन्यात भारतीय गोलंदाजांना आपली षटके पूर्ण करायला उशीर झाला. त्यामुळे आयसीसीने टीम इंडियाला दंड ठोठावला आणि टीम इंडियाच्या मॅच फीच्या १० टक्के रक्कम कापण्यात आली.
मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी टीम इंडियाला हा दंड ठोठावला. निर्धारित वेळेत खेळ संपवण्याची गरज होती. पण केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकल्याबद्दल दोषी आढळले. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दोषी आढळले. आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू दिलेल्या वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही तर त्यांना प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो. कर्णधार केएल राहुलने आरोप मान्य केला असल्याने सुनावणीची गरज न ठेवता, दंड जाहीर केला.