भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी टेम्बा बावुमानं भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्मा-विराट कोहली या जोडगोळीसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. पहिल्या सामन्याला मुकलेला टेम्बा बावुमा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज आहे. या सामन्याआधी कसोटीतील अपराजित कॅप्टननं दोन दिग्गजांचा उपस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद निश्चितच वाढली असून त्यांचा सामना करणं आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"मी शाळेत असताना..." काय म्हणाला टेम्बा बावुमा?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी रोहितचा खास उल्लेख करताना टेम्बा बावुमा म्हणाला की, मी शाळेत असताना रोहित शर्मा २००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे मालिका आणखी रंगतदार ठरते. दिर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा नेहमीच मोठे आव्हान निर्माण होते. या दोघांचा अनुभव आणि सातत्यपूर्ण दमदार कामगिरी हे टीम इंडियाच्या मजबुतीचं एक मोठं कारण आहे. दबावाच्या परिस्थितीतूनही संघ सावरण्यास संघाला त्यांचा मोठा आधार असतो, असे टेम्बा बावुमानं म्हटले आहे.
मार्को यान्सेनवरही कौतुकाचा वर्षाव
भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मार्को यान्सेन याने बॅटिंगमध्ये आपला क्लास दाखवून दिला होता. कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या तोंडचा हात हिरावून घेणाऱ्या मार्कोनं वनडेतही भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या कामगिरीवर भाष्य करताना बावुमा म्हणाला की, तो ऑलराउंडरच्या रँकिंगमध्ये कोणत्या स्थानावर आहे माहिती नाही. पण तो तिन्ही फॉरमॅटमध्ये निश्चितच टॉप १० मध्ये असेल, असे वाटते. या युवा खेळाडू आमची ताकद आहे, अशा शब्दांत त्याने मार्को यान्सेवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे.
आम्ही सामना गमावला, पण...
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या दोन दिग्गजांनी दमदार फलंदाजी केली. आम्ही सामना गमावला असला तरी शेवटच्या षटकापर्यंत लढतो. भारतीय संघाने चांगला खेळ केला. पण आम्हीही अल्प धावांनी मागे पडलो, असे सांगत पहिल्या पराभवाने खचून न जाता मालिकेत कमबॅक करण्याच्या इराद्याने मैदानात उतरू, असा विश्वासही दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने व्यक्त केला आहे.