ICC World Cup 2019 : ...अन् कांगारूनं पायावर उभं राहत जोरदार ठोसे मारलेच!

ICC World Cup 2019: इंग्लंड आणि भारत हे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले दोन संघ वर्ल्ड कप स्पर्धेत हॉट फेव्हरीट असतील, असे दावे केले जात होते.

By स्वदेश घाणेकर | Published: June 26, 2019 11:27 AM2019-06-26T11:27:35+5:302019-06-26T12:02:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Lots of talk about India or England to win the World Cup. But, Aussies getting better and better at this World Cup | ICC World Cup 2019 : ...अन् कांगारूनं पायावर उभं राहत जोरदार ठोसे मारलेच!

ICC World Cup 2019 : ...अन् कांगारूनं पायावर उभं राहत जोरदार ठोसे मारलेच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- स्वदेश घाणेकर

2018 पासून किंबहूना त्याआधीपासून सर्व संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागलेले. इंग्लंड आणि भारत हे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले दोन संघ वर्ल्ड कप स्पर्धेत हॉट फेव्हरीट असतील, असे दावे तेव्हापासूनच केले जात होते. त्यात दोन्ही संघांनी गेल्या वर्षभरात केलेली कामगिरीही बोलकीच होती. अधूनमधून न्यूझीलंडचे नाव येत होते, पण ते नेहमी डार्क हॉर्सच्या भूमिकेत राहिले आणि आताही तिच भूमिका ते बजावतील, असा अंदाज बांधला जात आहे. वर्षभर चाललेली चर्चा आणि सध्या समोर दिसलेली परिस्थिती याने डोकं जरा चक्रावलं आहे. या चर्चेत कुठेही नसलेल्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहेत, तर यजमान इंग्लंडचे स्थान डळमळीत झालं आहे. 

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या स्टार खेळाडूंना चेंडू कुरतडण्याचा कट रचण्याची दुर्बुद्धी सूचली आणि ऑस्ट्रेलियन संघाला घरघर लागली. या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईपर्यंत कोणीही खिजगणतीतही धरत नव्हते. अ‍ॅरोन फिंचला नेतृत्त्वाचा भार पेलवत नसल्याचेच वर्षभरात जाणवले. त्यामुळे हा संघ वर्ल्ड कप मध्ये फार काही कमाल करेल अशी आशा कमी जणांनाच होती. खरं सांगायच तर ऑस्ट्रेलियातील चाहत्यांना व माजी खेळाडूंनाही नव्हती. सर्वांच्या मुखात इंग्लंड आणि भारत यांचेच दावेदार म्हणून नाव होतं. पण मंगळवारच्या निकालानं अनपेक्षित धक्का दिला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात इंग्लंडला 29 वर्षांत ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेले नाही आणि कालही तेच झाले. 

ऑस्ट्रेलियाचे 285 धावांचे लक्ष्य इंग्लंड सहज पार करतील, अगदी पाच विकेट्स राखून असा दावा केला गेला. पण, प्रत्यक्षात उत्तम सांघिक खेळ करत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि इंग्लंड विजयाचा दावा करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली. या विजयासह वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. उर्वरित तीन संघ कोण असतील हे साखळी फेरीच्या लढती झाल्यानंतर स्पष्ट होईलच.

हेच ऑस्ट्रेलियन संघाचे वैशिष्ट्य आहे. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये ते आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी झोकून खेळ करतात. वॉर्नर आणि स्मिथ यांच्या एका चुकीनं वर्षभरात ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला. पण, स्मिथ, वॉर्नर यांनी एक वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून आयपीएलमधून कमबॅक केले. वर्षभर क्रिकेटपासून दूरावलेल्या वॉर्नरचे हात शिवशिवत होते आणि त्यानं वर्षभराचा सर्व राग आयपीएलमध्ये काढला. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. स्मिथनेही आत्मविश्वास वाढेल अशी खेळी केली. त्यात वर्ल्ड कपच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने भारत आणि पाकिस्तान यांना त्यांच्याच होम ग्राऊंडवर लोळवले. सर्व काही ऑस्ट्रेलियासाठी पोषक ठरतं गेलं.

वर्षभराच्या शिक्षेनं वॉर्नरला अधिक परिपक्व बनवलं. त्याच्या खेळीत तो पूर्वीचा जोश, फटकेबाजी दिसत नाही, असे अनेक जण म्हणत आहेत. पण, तांत्रिकदृष्ट्या त्याचा खेळ अधिक मॅच्युअर झाला आहे आणि याला कर्णधार फिंचनेही दुजोरा दिला. स्पर्धेच्या तोंडावर सर्व सकारात्मक गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झाल्या. स्मिथ वॉर्नर यांचे पुनरागमन, फिंचला गवसलेला सूर, दुखापतीतून सावरलेला मिचेल स्टार्क आणि त्याचा फॉर्म... त्यांना आणखी काय हवं होतं. वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. उगाच का त्यांच्या खात्यात पाच वर्ल्ड कप आहेत? महत्त्वाच्या स्पर्धेत कामगिरीचा आलेख कसा उंचवायचा याचे समिकरण ऑसी खेळाडू घोटून प्यायले आहेत. त्यामुळे त्यांनी सहावा वर्ल्ड कप जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही. 

त्यामुळे स्पर्धेपूर्वी चर्चेत नसलेल्या या कांगारूनं आता जोरदार ठोसे मारण्यास सुरुवात केली आहे, प्रार्थना फक्त एवढीच पुढील सामन्यात भारतीय संघाला त्यांचा सामोरा करावा लागल्यास त्याचा मार आपल्या जिव्हारी लागणारा नसावा...

Web Title: ICC World Cup 2019: Lots of talk about India or England to win the World Cup. But, Aussies getting better and better at this World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.