India vs. New Zealand World Cup Semi Final:...अन् धोनीवरून फक्त मारामारी व्हायचीच बाकी होती!

धोनीचे चाहते 'एक लब्ज मी मत कहना उस के खिलाफ' या पवित्र्यात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:17 PM2019-07-11T16:17:26+5:302019-07-11T16:30:39+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 India vs New Zealand Semi Final word war over ms dhoni slow innings | India vs. New Zealand World Cup Semi Final:...अन् धोनीवरून फक्त मारामारी व्हायचीच बाकी होती!

India vs. New Zealand World Cup Semi Final:...अन् धोनीवरून फक्त मारामारी व्हायचीच बाकी होती!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देटीम इंडियाच्या पराभवाची कारणमीमांसा यत्र-तत्र-सर्वत्र सुरू आहे. बरेच जण या पराभवासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीला जबाबदार धरत आहेत.

भारताचं क्रिकेट जगज्जेतेपदाचं स्वप्न उपांत्य सामन्यात भंगलं. न्यूझीलंडविरुद्धचा सामना टीम इंडियानं हरता-हरता जिंकवत आणला, पण अखेर गमावला. स्वाभाविकच हळवे क्रिकेटप्रेमी हळहळले, थोडे तापट होते ते वैतागले. आपल्याकडे सगळेच क्रिकेटतज्ज्ञ असल्यानं, या पराभवाची कारणमीमांसा यत्र-तत्र-सर्वत्र सुरू आहे. सामना सुरू असतानाही, हे 'सल्लागार' फॉर्मातच होते, पण आता ते पार 'सुटलेत'. बरेच जण या पराभवासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळीला जबाबदार धरत आहेत. परंतु, धोनीचे चाहते 'एक लब्ज मी मत कहना उस के खिलाफ' या पवित्र्यात आहेत. त्यावरूनच आज 'मुंबई लोकल'मध्ये 'राडा' झाला. कालचा विजय जसा थोडक्यात हुकला, तशी मारामारीही थोडक्यातच टळली म्हणायची!

अंबरनाथहून सुटणाऱ्या लोकलमधला प्रसंग. संवाद हिंदी आणि मराठीत सुरू होता. मधे-मधे xxx ही खूप होत्या. त्या वगळून जे शब्दयुद्ध रंगलं, ते असं...

धोनीविरोधकः 'अरे, कसला तुमचा धोनी... हरवली ना मॅच...' असं कुत्सितपणे म्हणत एक तरुण डब्यात शिरला. ग्रूपमधल्या एकाला टाळी देत दोन शिव्या हासडत त्यानं 'बॅटिंग' सुरू केली. असं हरण्यापेक्षा २०० रनमध्ये ऑल-आउट झालो असतो तरी चाललं असतं. उचलून फटके मारायची गरज असताना, हा शहाणा बॅकफूटवर खेळतो आणि म्हणे 'बेस्ट फिनिशर'. ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. 

त्याचं हे हास्य संपायच्या आत त्याच्यावर तिघांनी अटॅक केला. कालच्या सामन्यात हेन्री आणि फर्ग्युसननं भारतीय फलंदाजांवर केला तसाच. 

धोनी चाहतेः गप रे xxx. रोहित आणि विराटने काय दिवे लावले?... म्हणे, जगातले बेस्ट बॅट्समन... बॅट नाय धरता आली त्या विराटला... 

धोनीविरोधकः तुम्ही सुधारणार नाय रे. रोहितच्या सेन्च्युऱ्यांमुळे सेमीपर्यंत पोहोचले आणि आता त्यालाच शिकवा. फक्त टुकूटुकू धोनीची आरती ओवाळा. ४५ ओव्हर झाल्यावरही हो प्लेड करतोय बॉल. अख्खा वर्ल्ड कप तेच लावलंय. इंग्लंडची मॅच पण अशीच घालवली. 

धोनी चाहतेः धोनीने किमान प्लेड तरी केलं रे, कोहलीला तर ते पण नाय जमलं ना. धोनीला सातव्या नंबरवर पाठवलं तर कसा जिंकवणार बे तो? मिडल ऑर्डर वीक आहे हे दिसतंय, तरी पांड्याला वर पाठवलं. त्याने केली माती. कसली डोंबलाची स्ट्रॅटेजी.

धोनीविरोधकः अरे, एवढी वर्षं खेळतो बोलता ना तुम्ही. अनुभवी अँड ऑल. मग कधी अटॅकिंग खेळायचं समजत नाय का? वय झालं आता. रिटायर करा त्याला. 

धोनीसमर्थकः किंमत नाय कळणार रे तुम्हाला धोनीची. तो विराट येडा होतो टेन्शनमध्ये. लगेच धोनीकडे येतो धावत. डीआरएसला पण धोनी लागतो. सगळं धोनीनेच करायचं, मग हा काय फक्त ट्रॉफ्या उचलणार का? 

धोनीविरोधकः xxx. म्हणूनच तर बोललो ना घेऊन जा तुझ्या धोनीला. आम्ही बघतो कसा जिंकायचा वर्ल्ड कप. म्हातारा झाला तो आता. एक चौका मारायचा ट्राय पण केला नाय त्याने. 

धोनीसमर्थकः तो स्ट्राइक देत होता ना जाडेजाला. दोघे पण अटॅक करायला गेले आणि विकेट गेली तर मागे कोण होतं का? 

धोनीविरोधकः मग एवढा वेळ उभा राहिलाच होता, तर जाडेजा गेल्यावर जिंकवायचं ना. चौके-छक्के मारतो ना एरवी. मग दोन रनसाठी कशाला मरायचं? फालतूची विकेट फेकली. 

धोनीसमर्थकः बास कर बे फालतूगिरी. सगळ्यांनी बॉल वेस्ट केले, ते नाय दिसणार तुम्हाला. धोनीने केले की दिसणार. चोपायला पायजे तुम्हाला. एवढी मॅच आली ती त्याच्यामुळे. नाहीतर इज्जत गेली असती. 

धोनीविरोधकः जमत नाय बोल ना मारायला. एवढी मॅच आणली बोलतो. जिंकवलं तर नाय ना? असे पण हरलो, तसे पण हरलो असतो. पण मारून हरलो असतो.

धोनीसमर्थकः मारायला जाम आवडतं ना तुला, मग आता मी मारतो, तू खा मार. 

असं म्हणून दोघं पुढे सरसावलीच होती. पण, इतका वेळ यांचा कल्ला हसत-हसत बघणाऱ्या ग्रूपमधल्या इतर मेंबर्सनी मध्यस्थी केली आणि 'विराटसेना'-'धोनीसेने'ला खाली बसवलं. कालच्या मॅचइतकीच यांची मॅचही भारी झाली हे खरं, फक्त शिव्या जरा कमी असत्या तर बरं झालं असतं, असं राहून राहून सगळ्यांनाच वाटलं.

ट्रेनमधलं हे चित्र प्रातिनिधिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय म्हणता?




 

Web Title: ICC World Cup 2019 India vs New Zealand Semi Final word war over ms dhoni slow innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.