Dhoni, Kohli to lead ICC team | आयसीसी संघाचे नेतृत्व धोनी, कोहलीकडे; दशकातील सर्वोत्तम कसोटी, वनडे, टी-२० संघ जाहीर

आयसीसी संघाचे नेतृत्व धोनी, कोहलीकडे; दशकातील सर्वोत्तम कसोटी, वनडे, टी-२० संघ जाहीर

दुबई : भारताचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) दशकातील एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली याला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले. एकदिवसीय आणि टी-२० संघात भारतीय क्रिकेट संघाचे वर्चस्व दिसले.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघात तीन व टी-२० आंतरराष्ट्रीय संघात चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले. कसोटी संघात इंग्लंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंना स्थान मिळाले. याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा धोनी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. संघात रोहित शर्मा आणि भारताचा विद्यमान कर्णधार कोहलीलादेखील स्थान मिळाले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात धोनीशिवाय रोहित, कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. 

आयसीसीची निवड आश्चर्यचकित करणारी
आयसीसीने टी-२० संघाची निवड करताना केवळ बुमराह, मलिंगा आणि राशिद खान या गोलंदाजांना स्थान दिले. पोलार्ड व मॅक्सवेल हे अष्टपैलू म्हणून संघात आहेत, पण गोलंदाजांचा विचार करता आणखी स्पेशालिस्ट गोलंदाज संघात असायला हवा होता. ट्रेंट बोल्ट,  कमिन्स, पॅटिन्सन, होल्डर, शमी, स्टार्क यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आयसीसी संघ
रोहित शर्मा, ख्रिस गेल, ॲरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी, किरोन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

ॲलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

रोहित शर्मा, डेव्हिड वार्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकीब अल हसन, महेंद्रसिंग धोनी, बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, मलिंगा.

कोहली चार पुरस्कारांसाठी शर्यतीत

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, तसेच सर्वोत्तम कसोटी, एकदिवसीय व टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठीच्या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात रविचंद्रन अश्विन यालाही स्थान मिळाले आहे. 
दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघात भारताचे सर्वाधिक खेळाडू आहेत. टी-२० संघातही भारताचे चार खेळाडू आहेत. 
महिलांमध्ये हरमनप्रीत कौर व पूनम यादव यांचा दशकातील टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. मिताली राज व झुलन गोस्वामी यांनी एकदिवसीय संघात स्थान मिळवले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhoni, Kohli to lead ICC team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.