Dale Steyn apologises to Virat Kohli and Twitterati can’t decipher why | डेल स्टेनने का मागितली विराट कोहलीची माफी, पाहा तुम्हाला उत्तर सापडतंय का?
डेल स्टेनने का मागितली विराट कोहलीची माफी, पाहा तुम्हाला उत्तर सापडतंय का?

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक क्विंटन डि कॉककडे सोपवण्यात आले आहे. या संघातून मात्र फॅफ ड्यू प्लेसिसला वगळण्यात आले आहे. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र प्लेसिस कायम असेल. या संघावरून आफ्रिकेच्या एका क्रिकेट चाहत्यानं डेल स्टेनला एक प्रश्न विचारला. दिग्गज गोलंदाज डेल स्टेननं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना स्टेनने अखेरीस टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची माफी मागितली. स्टेनच्या या माफीमागचं कारण नेटिझन्सला समजलं नाही आणि त्यानंतर पुन्हा प्रश्नांचा भडीमार झाला.

स्टेनला इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. दरम्यान, भारत दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात ख्रिस मॉरिसचा समावेश नसल्यानं चाहत्याने थेट स्टेनला प्रश्न विचारला. चाहता आणि स्टेन यांच्यात प्रश्नोत्तराचा खेळ रंगला आणि सरतेशेवटी स्टेनने कॅप्टन कोहलीची माफी मागून रजा घेतली. स्टेननं असं का केलं, यामागचं कारण मात्र कोणाला समजू शकलं नाही.

स्टेनच्या त्या माफीनंतर अनेक चाहत्यांनी या संभाषणात उडी घेतली. 


टीम इंडियाविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला तितकी महत्त्वाची वाटत नाही, त्यामुळेच त्यांनी असा संघ निवडला असावा, असा तर्क लावत स्टेनने कोहलीची माफी मागितली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 सामन्याने सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका तीन कसोटी सामनेही खेळणार आहे. 

कसोटीचा संघ - फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनीस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डिन एल्गर, झुबयर हम्झा, केशव महाराज, एडन मार्कराम, सेनुरन मुथूसॅमी, लुंगी एनगिडी, अॅनरिच नोर्टजे, वेर्नोन फिलेंडर, डेन पिएड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड. 

ट्वेंटी-२० संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, टेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा  हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.

Web Title: Dale Steyn apologises to Virat Kohli and Twitterati can’t decipher why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.