Breaking News: Shikhar Dhawan will remain in England - Bcci | Breaking News : शिखर धवन इंग्लंडमध्येच राहणार, पर्यायी खेळाडूची निवड तुर्तास नाही
Breaking News : शिखर धवन इंग्लंडमध्येच राहणार, पर्यायी खेळाडूची निवड तुर्तास नाही

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दुखापतग्रस्त शिखर धवनला भारतामध्ये पाठवण्यात येणार नाही. धवन हा संघाबरोबर इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याचबरोबर धवनचा पर्यायी खेळाडू तुर्तास तरी निवडण्यात येणार नाही. बीसीसीआयने एक ट्विट केले असून याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे.


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान नाथन कुल्टर-नीलचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 

दरम्यान, आज हाताचा स्कॅन केल्यानंतर  शिखरच्या हालाता झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिखर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. आता शिखर धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. 


धवनच्या जागी रीषभ पंतला संधी द्या, सुनील गावस्कर यांचे मत
भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागी आता कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळायला हवे, याबाबत चर्चा सुरु आहे. पण भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धवनच्या जागी रिषभ पंतला संधी द्यावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

गावस्कर याबाबत म्हणाले की, " पंतला धवनच्या जागी संघात स्थान द्यायला हवे. कारण पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी लायक खेळाडू होता." 

गावस्कर पुढे म्हणाले की, " धवन हा १८ दिवसांमध्ये फिट होईल, असे जर डॉक्टर म्हणत असतील तर त्याचासाठी आपण थांबायला हवे. जर काही सामने धवन संघातून बाहेर राहिला तरी त्यालाच संधी मिळायला हवी."

गावस्कर यांच्याबरोबरच इंग्लंडचा माजी तडफदार फलंदाज केव्हिन पीटरसनने धवनच्या जागी पंतलाच संधी द्यावी, असे म्हटले आहे.


Web Title: Breaking News: Shikhar Dhawan will remain in England - Bcci
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.