मुंबई : भारताने वेस्ट इंडिज दौऱ्यात ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. या दौऱ्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी समाधानकारक झाली. मिळालेल्या संधीचं युवा खेळाडूंनी सोनं केलं. पण, कसोटीत लोकेश राहुलला आलेले अपयश हा अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात त्याला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मुद्दा सोडला तर विंडीज दौऱ्यात अनुष्का शर्माचे संघासोबत असणे, हा सर्वांना खटकणारा विषय ठरत आहे. या संपूर्ण दौऱ्यात अनुष्का कॅप्टन विराट कोहलीसोबत दिसली. त्यामुळे कोहलीला रॉयल ट्रीटमेंट का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. त्याचे उत्तर आम्ही शोधून काढले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली प्रशासकिय समिती, प्रमुख प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी संघाच्या परदेश दौऱ्यादरम्यान कुटुंबीयांचा कालावधी निश्चित केला होता. त्यानुसार परदेश दौऱ्यातील पहिल्या तीन आठवड्यानंतर कुटुंबीय सदस्य खेळाडूंसोबत राहू शकतील. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान कुटुंबीय सदस्यांना खेळाडूंसोबत राहण्याची विनंती एका वरिष्ठ खेळाडूनं केली होती, परंतु बीसीसीआयनं ती अमान्य केली. वेस्ट इंडिज दौऱ्यात या नियमात सूट दिली होती, परंतु कोहली वगळता अन्य खेळाडूंचे कुटुंब विंडीज दौऱ्यात आले नव्हते.  

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियातील खेळाडूंना विंडीज दौऱ्यादरम्यान फॅमिली क्लॉजमध्ये बदल केला होता. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच्या या वेस्ट इंडिज दौऱ्यात संघातील खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ''वर्ल्ड कप स्पर्धेत खेळाडू तणावजन्य परिस्थितीतून जात होते. त्यानंतर लगेचच वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात झाली. अशावेळी खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची परवानगी देणं गरजेचं होतं. विंडीज दौऱ्यानंतर लगेचच टीम इंडिया मायदेशातही सातत्यानं क्रिकेट मालिका खेळणार आहे. अशा वेळी मायदेशात कुटुंबीयांसोबत प्रवास करणे, थोडे अवघड जाते,''अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.


  

Web Title: BCCI relaxed 'family clause' in West Indies tour 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.