Andre Russell got out by Adam Zampa in unofficial World Cup warm-up match between Australia and the West Indies | विंडीजच्या संघात परतला आयपीएल गाजवणारा आंद्रे रसेल; पण स्कोअर पाहून धक्का बसेल
विंडीजच्या संघात परतला आयपीएल गाजवणारा आंद्रे रसेल; पण स्कोअर पाहून धक्का बसेल

साउदम्प्टन : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आंद्रे रसेलचे बुधवारी वेस्ट इंडिज संघात पुनरागमन झाले. जवळपास दहा महिन्यांनंतर रसेलने विंडीजकडून वन डे सामना खेळला. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी विंडीजने बुधवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनऑफिशीयल वन डे सामना खेळला. या सामन्यात सर्वांना उत्सुकता होती ती रसेलच्या फलंदाजीची. पण, पहिल्या सामन्यातील त्याचा स्कोअर पाहून सर्वांना धक्का बसेल. कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रसेलने आयपीएलमध्ये मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने 14 सामन्यांत 204.81च्या स्ट्राईक रेटने 510 धावा चोपून काढल्या. त्यात त्याने 31 चौकार आणि 52 षटकारांची आतषबाजी केली. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी होता. गोलंदाजीतही त्याने 11 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने त्याला वर्ल्ड कप चमूत स्थान दिले.


जुलै 2018 मध्ये तो विंडीजकडून अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वीच्या सराव सामन्यात त्याची बॅट किती धावा चोपते याची उत्सुकता होती. पण, ऑसींचा युवा गोलंदाज अॅडम झम्पाच्या फिरकीसमोर त्याला खेळपट्टीवर फारकाळ टिकता आले नाही. अवघ्या चार चेंडूंचा सामना करून 1 चौकारासह 5 धावांवर तो माघारी परतला. झम्पाने त्याला त्रिफळाचीत केले. 


Web Title: Andre Russell got out by Adam Zampa in unofficial World Cup warm-up match between Australia and the West Indies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.