‘डीसीसी’साठी आज मतदान

By Admin | Updated: May 7, 2015 00:57 IST2015-05-07T00:51:04+5:302015-05-07T00:57:35+5:30

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंधरा जागेसाठी गुरूवारी मतदान होत आहे. निवडणूक अखाड्यात असलेल्या ३८ उमेदवारांचे भवितव्य ८५६ मतदार ठरविणार आहेत.

Today's poll for 'DCC' | ‘डीसीसी’साठी आज मतदान

‘डीसीसी’साठी आज मतदान


उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंधरा जागेसाठी गुरूवारी मतदान होत आहे. निवडणूक अखाड्यात असलेल्या ३८ उमेदवारांचे भवितव्य ८५६ मतदार ठरविणार आहेत. प्रक्रियेसाठी सुमारे ५६ अधिकारी, कर्मचारी व १६ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डबघाईला आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रे-भाजपा घरोबा केला. तर काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीचा हात घेतला आहे. प्रचारादरम्यान, या दोन्ही पॅनलच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्योराप झाले. प्रचाराच्या तोफा मंगळवारी रात्री थंडावल्यानंतर बुधवारपासून गुपचूप प्रचाराने वेग घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, गुरूवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंधरा जागेसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आठ अपक्षांसह ३८ उमेदवार आहेत.
या उमेदवारांचे भवितव्य ८५६ मतदार ठरविणार आहेत. यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघातील ४५५ मतदार, इतर शेती सहकारी प्रतिनिधी मतदार संघातील २६१ मतदार आहेत. तसेच नागरी बँका प्रतिनिधी मतदार संघामध्ये १४० मतदार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. मतदारांची अत्यल्प संख्या आणि त्यातच दोन्ही पॅनलने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक निकाल ९ मे रोजी जाहीर करण्यात येणार असून, याचीही प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी-भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलकडून माजी.खा. डॉ. पद्मसिंह पाटील, आ.राणाजगतसिंह पाटील, जीवनराव गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तर कॉग्रेस शिवसेनेकडून प्रा.तानाजी सावंत, आ. मधुकरराव चव्हाण, आ.बसवराज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी. आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आदींनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रचारात पुढाकार घेतला होता.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेतून सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नसताना जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन बापूराव पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या उमरगा जनता सहकारी बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेली ७१ लाख ४० हजार रुपयांची ठेव दोन-तीन महिन्यांपूर्वी काढून घेतल्याचा आरोप हर्षवर्धन चालुक्य यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. दरम्यान, याबाबत बापूराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो बँकेचा व्यवहार आहे. त्याबद्दल काय बोलणार, असे त्यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आमच्याच पॅनलला विजयी करा, असा प्रचार दोन्ही पॅनलकडून केला जात आहे. जिल्हा बँकेसाठी केवळ ८५६ जण मतदानासाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळेच प्रत्येक मतासाठी कमालीची चुरस होत आहे. दोन्ही पॅनलने आपले मतदार राज्याच्या विविध भागात सहलीसाठी पाठविले आहेत. अशा सहलीवर गेलेल्या मतदारांची संख्या तब्बल साडेचारशे म्हणजेच एकूण मतदानाच्या निम्याहून अधिक आहे. हे मतदार उद्या थेट मतदान केंद्रावर पोहोंचतील. सहलीला गेलेल्यांपैकी बहुतांश मतदारांची मते ‘फिक्स’ मानली जात आहेत. त्यामुळेच सहलीवर न गेलेल्या निम्या मतदारांवर आता दोन्ही पॅनलची मदार आहे. दरम्यान, दोन्ही पॅनलना ‘क्रॉस’ व्होटींगची चिंता सतावत आहे. शिवसेना-काँग्रेसने प्रचारादरम्यान विविध आश्वासने दिली आहेत. तर भाजपा-राष्ट्रवादीने बँकेला संकटातून बाहेर काढण्याची ग्वाही दिली आहे. अशा स्थितीत मतदार कोणाच्या पाठिशी राहतात, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

Web Title: Today's poll for 'DCC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.