जिल्ह्यात पेरण्या खोळंबलेल्याच!
By Admin | Updated: July 17, 2014 01:07 IST2014-07-17T00:58:24+5:302014-07-17T01:07:18+5:30
जालना : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात जुलैच्या मध्यंतरापर्यंत केवळ १४ टक्केच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, आठही तालुक्यातील बहुतांशी पेरण्या पावसाअभावी पूर्णत: खोळंबल्या आहेत.

जिल्ह्यात पेरण्या खोळंबलेल्याच!
जालना : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात जुलैच्या मध्यंतरापर्यंत केवळ १४ टक्केच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, आठही तालुक्यातील बहुतांशी पेरण्या पावसाअभावी पूर्णत: खोळंबल्या आहेत.
दरम्यान, मूग, उडीद या दोन पिकांचे लागवड क्षेत्र लांबलेल्या पावसामुळे कमी होणार आहे. तर ठिबकवर लागवड केलेल्या कापसाची दुबार पेरणी करावी, लागणार असे चित्र आहे.
जुलैचा दुसरा आठवडा संपला. तरीही जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. १४ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण केवळ ५१. ७३ टक्के एवढेच आहे. त्यात जिल्ह्यात परतूर तालुक्यात ९५.०४, पाठोपाठ जालन्यात ७२.७५ एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. अंबड तालुक्यात ५५.२७, घनसावंगी ५४.५५, भोकरदन ४८.०२, बदनापूर ३०.०२, जाफराबाद २९.०६, तर सर्वात कमी म्हणजे मंठा तालुक्यात २८ मिलीमीटरएवढीच पावसाची नोंद झाली आहे.
या संपूर्ण जिल्ह्यात आठही तालुक्यात या अपुऱ्या पावसामुळेच खरिपाच्या पेरण्या पूर्णत: खोळंबल्या आहेत. खरिपाच्या पेरण्यांचे प्रमाण जुलै मध्यतंरापर्यंत १४ टक्के एवढेच आहे.
जिल्ह्यात ७८ हजार २५३ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्यापैकी ५२ हजार हेक्टर केवळ कापसाचे आहे. अन्य पिकांची पेरणीच झाली नाही. विशेषत: मूग व उडीद या पिकांची लागवडच होणार नाही, असे चित्र आहे.
यावर्षी खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. गतवर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली होती. पिकांची स्थितीही समाधानकारक होती. यावर्षी अद्याप पेरणीच न झाल्याने आगामी काळ दुष्काळसदृश स्थितीसारखा राहील, अशी चिन्हे आहेत. यामुळे शेतकरी अक्षरश: हबकून गेला आहे.
जिल्ह्यात खरिपाचे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. त्यापैकी अडीच लाख हेक्टर कापसाचे क्षेत्र आहे. असे असले तरी जिल्ह्यात फक्त १८५ . २१ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने भोकरदन २२.८८, जाफराबाद- १३.०९, जालना ३७.९४, अंबड ५२, परतूर २२.२७, बदनापूर १२.५२, घनसावंगी ६.२७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ६.७ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. सोयाबीनची जाफराबाद तालुक्यात .१६ हेक्टरवर तर ०.२ टक्के पेरणी झाली आहे. इतर तालुक्यांत शून्य टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. (प्रतिनिधी)
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण २५ टक्केही नाही
यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्याअखेर फक्त ५१.७३ मिलीमीटर पावासची नोंद झाली आहे. गतवर्षी १४ जुलै अखेर जिल्ह्यात २३३.०४ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. ही तफावत मोठी भीषण विदारकता स्पष्ट करणारी आहे.
या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचा सुद्धा प्रश्न उभा राहील अशी चिन्हे आहेत. सप्टेंंबर २०१४ पर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून होतो आहे. परंतु जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात चाराटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात ३६ गावांना पाणीपुरवठा सुरु आहे. १२८ विहिरींचे प्रशासनाने अधिग्र्रहण केलेले आहे. परंतु ही संख्या या आठ दिवसांत दुपटीने वाढेल, असा अंदाज जिल्हा महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे. टंचाईग्रस्त गावांत तात्काळ टँकर सुरु करण्याची शिफारशीही करण्यात आल्या आहेत.
तालुकायावर्षीचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस
जालना७२.७५२९७.८२
भोकरदन४८.०२२३२.७९
जाफराबाद२९.०६३१२. २
बदनापूर३०.२१८३
परतूर९५.४२७८.४
अंबड५५.२७२०२.३९
घनसावंगी५४.५५१३०.७४
मंठा२८ २२७.२५
एकूण५१.७३३३३.०४