चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांची ‘सत्त्वपरीक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:00+5:302021-01-13T04:10:00+5:30
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेतल्या खऱ्या; परंतु परीक्षा होऊन चार महिन्यांचा ...

चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांची ‘सत्त्वपरीक्षा’
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेतल्या खऱ्या; परंतु परीक्षा होऊन चार महिन्यांचा कालावधी होत आला. अलीकडे काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. मात्र, अद्यापही विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेतच आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये एका खासगी संस्थेच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेतल्या. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पुढाकार घेऊन या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी अधिष्ठाता व अन्य अधिकाऱ्यांची पथके तैनात केली. परीक्षेच्या काळात तांत्रिक अडचण आल्यास तत्काळ सुविधा पोहोचविण्याची तयारी ठेवली. परिणामी, राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा तुरळक अडचणी वगळल्या, तर सुरळीत पार पडल्या.
तथापि, परीक्षांच्या निकालाची तत्पर्ता दाखविण्यात मात्र, विद्यापीठ अपयशी ठरले. चार महिन्यांचा कालावधी झाला; परंतु अजुनही अनेक विद्यार्थी निकालासाठी विद्यापीठात फेऱ्या मारत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल कार्यालयीन पडताळणीसाठी प्रलंबित आहेत, तर अनेकांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळालेले नाहीत. असमाधानकारक निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्विलोकनासाठी परीक्षा विभागाकडे विचारणा केली तेव्हा ऑनलाईन परीक्षेत गुणपडताळणीची सुविधा उपलब्ध नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
चौकट....
टक्केवारीचा फार्स कशासाठी
विद्यापीठाने मागील काही वर्षांपासून सर्व अभ्यासक्रमांचे निकाल हे टक्केवारीऐवजी ग्रेड पद्धतीनुसार जाहीर करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, ‘पेट’साठी अर्ज भरताना त्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे गुण हे टक्केवारीमध्ये भरणे अनिवार्य आहे. यासाठी अनेक पदव्युतर विद्यार्थी टक्केवारीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यााठी उस्मानाबाद, बीड, जालना जिल्ह्यांतून विद्यापीठातील परीक्षा विभागात चकरा मारत आहेत. मात्र, परीक्षा विभागातील कर्मचारी हे निकालाचा तिढा सोडविण्यात व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना रित्या हातीच परत जावे लागत आहे. याबाबींकडे भारतीय विद्यार्थी सेनेचे संघटक डॉ. तुकाराम सराफ यांनी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले तेव्हा मंगळवारी विद्यापीठाने ‘पेट’च्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली.