उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची बिले व निवडणूकीचा खर्च असे १ कोटी ३३ लाखांवर येणे असल्याने प्रशासनाने २०१३ मध्ये तेरणा सहकारी कारखान्याची जमीन जप्त केली होती. मात्र त्यावेळी जमिन विक्री करण्यास औरंगाबाद न्यायालयाने स्थगिती दिल्याने विक्री करता आली नव्हती, न्यायलयाने आता जमिनी विक्रीची परवानगी दिल्याने सदर जमिनीची विक्री करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याकडून शेतकऱ्यांची २०१० - २०११ या हंगामातील एफ. आर. पी दराप्रमाणे देय असलेली रक्कम थकीत होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सदर रक्कम मिळावी यासाठी विविध स्वरुपाची आंदोलने करुन यासंदर्भात साखर आयुक्तांकडेही दाद मागितली होती. त्यावर ऊस उत्पादकांची १ कोटी ८ लाख ८४ हजार १७७ इतकी देय रक्कम वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. वारंवार विचारणा व नोटिसा देवूनही तेरणा कारखान्याने उसाची बिले काढली नाहीत. तसेच कारखान्याने निवडणुकीचा २५ लाख २७ हजार ७३२ खर्च ही अदा केला नाही. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी या खर्चाच्या वसुलीचे आदेश दिले होते.त्यानुसार शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची रक्कम देण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा मधील तरतुदीनुसार येणे असलेली रक्कम १ कोटी ८ लाख ८४ हजार १७७ रुपये वसुलीसाठी कारखान्याची ढोकी येथील गट क्र. ७९८ मधील ५ हेक्टर स्थावर मालमत्ता तहसीलदारांनी जप्त केली होती. सदर जमिनीचा आता २४ डिसेंबर २०१४ रोजी दोन वार लिलाव मोक्यावर होणार असून, ३० डिसेंबर रोजी तिसरावार तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. निवडणुकीचा खर्च २५ लाख २७ हजार ८३१ रुपये येणे असल्याने त्या रकमेच्या वसुलीपोटी कारखान्याची ढोकी येथील गट क्र. २७७ मधील १ हेक्टर १९ आर इतकी स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती , या जमिनीची विक्री करुन आरआरसी ची रक्कम वसुलीसाठी उक्त जमिन विक्रीची उद्घोषणा करण्यात आल्याचे तहसिलदार काकडे यांनी सांगितले. मालमत्तेची विक्री करून प्राप्त होणाऱ्या पैैशातून शेतकऱ्यांची थकित बिले अदा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘तेरणा’च्या जमिनीची होणार विक्री
By admin | Updated: December 14, 2014 00:06 IST