नव्या १ हजार १२५ किमी मार्गाने मराठवाड्यात रेल्वेला मिळेल ‘स्पीड’, 'असे' आहेत नवे रेल्वे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:25 IST2025-12-09T16:23:30+5:302025-12-09T16:25:01+5:30
काही रेल्वे मार्ग सर्वेक्षणात, काहींचे ‘डीपीआर’ तयार, तर काहींसाठी भूसंपादन प्रक्रिया

नव्या १ हजार १२५ किमी मार्गाने मराठवाड्यात रेल्वेला मिळेल ‘स्पीड’, 'असे' आहेत नवे रेल्वे मार्ग
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आगामी काही वर्षांत नव्या १ हजार १२५ कि.मी. रेल्वे मार्गांचे जाळे वाढणार आहेत. यातील काही रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण झाले आहे. काही रेल्वे मार्गांचे ‘डीपीआर’ तयार आहेत, तर काही रेल्वे मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. हे रेल्वे मार्ग झाल्याने मराठवाड्यातील रेल्वेला खऱ्या अर्थाने ‘स्पीड’ मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर-बीड- धाराशिव या २४० कि.मी. आणि छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव या ९३ कि.मी. रेल्वे मार्गाचे ऑगस्टमध्ये ‘लिडार’ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर या ८५ कि.मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ सहा महिन्यांपूर्वी केंद्राला सादर करण्यात आहे, तर बहुप्रतीक्षित जालना - जळगाव या १७४ कि.मी. अंतराच्या मार्गाचीही भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. सध्या मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्रमार्गे दिल्लीला जाण्यासाठी मनमाडमार्गे ३३६ किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागतो. जालना - जळगाव रेल्वे मार्गाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १७४ किलोमीटरवर येईल. यासह मराठवाड्यात अन्य काही नवे मार्गांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
सध्या ८८५ कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग
मराठवाड्यात सध्या ८८५ कि.मी. अंतराचे रेल्वे मार्ग आहे.
२७५ कि.मी.चा मार्ग होणार दुहेरी
मनमाड (अंकाई) ते परभणी या २७५ कि.मी. अंतराचा मार्ग दुहेरी होणार आहे. यात मनमाड (अंकाई) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. अंतराच्या मार्गाचे दुहेरीकरण सध्या सुरू आहे, तर छत्रपती संभाजीनगर ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
असे आहेत नवे रेल्वे मार्ग...
मार्ग : अंतर
- छत्रपती संभाजीनगर - बीड - धाराशिव : २४० कि.मी.
- छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव : ९३ कि.मी.
- बुलडाणा ते लातूर : १३५ कि.मी.
- कलबुर्गी - लातूर : १३९ कि.मी.
- जालना - खामगाव : १५५ कि.मी.
- लातूर - नांदेड : १०४ कि.मी.
- जालना - जळगाव : १७४ कि.मी.
- छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर : ८५ कि.मी.
अर्थसंकल्पातून मार्गी लागावे काम
मंजुरी मिळालेल्या काही मार्गांसंदर्भात काहीही झालेले नाही. काहींचे ‘डीपीआर’ झालेले, सर्वेक्षण झाले आहे. अशा रेल्वे मार्गांना आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळावी.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक.