भत्त्यापासून पोलीस वंचितच
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:38:41+5:302014-06-03T00:42:28+5:30
बदनापूर : बदनापूर पोलीस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणुकीचे काम केलेल्या पोलिस, होमगार्ड कर्मचार्यांना अद्यापही त्यांच्या कामचा भत्ता मिळाला नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भत्त्यापासून पोलीस वंचितच
बदनापूर : बदनापूर पोलीस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणुकीचे काम केलेल्या पोलिस, होमगार्ड कर्मचार्यांना अद्यापही त्यांच्या कामचा भत्ता मिळाला नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान बुथव्यतिरिक्त सेक्टर पेट्रोलिंग, झोनल पेट्रोलिंग यासह इतर कामे पोलिसांनी केली आहेत. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक संवेदनशिल गावांमध्ये शांततेत मतदान व्हावे, याकरिता अनेक अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते. मतदान केंद्रांव्यतिरिक्त एकूण २३९ पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली. २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया संपली, १६ मे रोजी निकालही लागले. मात्र, तब्बल सव्वा महिन्यानंतरही संबंधित पोलीस कर्मचार्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामाचा भत्ता देण्यात आलेला नाही. केवळ मतदान बुथवर काम केलेल्या पोलिस कर्मचार्यांनाच हा भत्ता मिळालेला आहे. निवडणुकीच्या कामासाठी सात खाजगी वाहने लावण्यात आली होती. या वाहनधारकांनाही ठरवून दिल्याप्रमाणे त्यांचे मानधन, वाहनखर्च व इतर भत्ता देण्यात आला नाही. या निवडणुकीत कामे केलेल्या अन्य कर्मचार्यांना भत्ता मिळालेला असून, संरक्षणाचे काम करणारे पोलीस कर्मचारी मात्र अद्याप भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. या संदर्भात तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर म्हणाले की, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या भत्त्याची मागणी पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकार्यांकडे करण्यात येते. जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षकांकडे हा भत्ता देतात. नंतर पोलीस विभागाकडून भत्ता वाटप होतो. तसेच वाहनांना वाटप करण्यात येणार्या निधीसाठी वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे. अद्याप निधी प्राप्त झाला नाही. निधी येताच संबंधित वाहनधारकांना रक्कम वाटप करण्यात येईल. (वार्ताहर)