विठ्ठल फुलारी, भोकर तालुक्यातील पोमनाळातांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता डिजिटल झाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाला ज्ञानरचनावादाची जोड देण्यात आली आहे. सांकेतिक भाषा वापरुन विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध करण्याचा प्रयोगही येथे सुरू करण्यात आला आहे.४पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेत ३७ विद्यार्थी आहेत. दत्तात्रेय कदम व व्यंकटी झुंझारे हे दोन शिक्षक मेहनत घेवून शाळेला नवीन रुप दिले आहे. टँकरग्रस्त असलेल्या या तांड्यावर भीषण पाणीटंचाई आहे; पण येथील विद्यार्थी वृक्षसंवर्धन करण्यासाठी सलाईनचा उपयोग करुन प्रत्येक झाडाला पाणी पोहोचवतात. शाळेत बचत बँक सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच बचतची सवय लागली आहे. वैयक्तिक स्वच्छता तर इथली जमेची बाजू आहे. ४पाणीटंचाई लक्षात घेवून येथे पक्ष्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे. येथील विद्यार्थी कारागिरांच्या मुलाखती घेवून इतर कलाही आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांनी स्वखर्चातून ज्ञानरचनावादाचे रेखाटन केले आहे. मनसळच्या शाळेचा वसा घेत विविध साहित्याची निर्मिती करुन विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न होत आहे. सांकेतिक भाषेचा वापर करुन भाषा समृद्ध करण्याचा प्रयोग या शाळेने सुरू केला आहे. ४शिक्षकांची तळमळ पाहून ग्रामस्थ या शाळेसाठी धावून आले आहेत. शाळा डिजिटल व्हावी प्रोजेक्टरचा वापर करुन विद्यार्थ्यांना सहजतेने शब्दाच्या जवळ जाता यावे म्हणून ग्रामपंचायतने दहा हजारांचा निधी शाळेला दिला. ग्रामस्थांनी पंधरा हजारांची मदत केली. विशेष म्हणजे, भोकर येथील हॉटेल आर्या व चंद्रा येथे काम करणाऱ्या तरुण कामगारांनी या शाळेसाठी ४ हजार १०० रुपयांची मदत दिली आणि मग शाळेला नवीन रुप मिळाले. आता ही शाळा डिजिटल झाली आहे. एकीकडे ज्ञानरचनावादचा आधार घेवून सोबतीला विविध साहित्य देवून विद्यार्थ्यांना हसत खेळत स्वयंअध्यापनाची गोड लावण्यात आली आहे तर प्रोजेक्टरचा वापर करीत अनेक अवघड विविध सोप्या पद्धतीने विद्यार्थी आत्मसात करीत आहेत. सदरील ज्ञानरचनावाद व प्रोजेक्टरच्या वापरामुळे तालुक्यात शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न होत आहे.
पोमनाळा तांड्यावरील शाळा झाली डिजिटल
By admin | Updated: February 24, 2016 23:52 IST