वाळूज महानगर : पंढरपुरात ट्रान्स्पोर्टचालकाचे चार जणांनी दोन लाख रुपये लुटले. त्यापैकी दोघांना नागरिकांनी पकडले असून, दोघे रकमेसह पळून गेले.सोपान मुरलीधर कदम (५५, रा. म्हाडा कॉलनी) यांचे औद्योगिक परिसरात हरिओम ट्रान्स्पोर्ट आहे. गुरुवारी कदम यांनी पंढरपूरच्या महावीर चौकातील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेतून १.९० लाख ८०० रुपये काढले व ते बॅगमध्ये ठेवले. त्यांनी बँकेबाहेर उभी केलेली दुचाकी (एमएच.-२०, डी. के. ४४०३) पंक्चर झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी पैशाची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवून पंक्चर काढण्यासाठी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील अब्बास पेट्रोलपंपाजवळील दुकानावर आले. तेथे ते पंक्चर काढण्यासाठी थांबले असता त्यांना १० फुटांवर तरुण फीट येऊन पडल्याचे दिसले. कदम व काही नागरिक मदतीसाठी तिकडे धावले. नागरिक त्याच्याजवळ येताच तो क्षणार्धात उभा राहिला व तेथून चालू लागला. कदम परत दुचाकीजवळ परतताच त्यांना डिक्कीतून पैशांची बॅग गायब झाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड करून फीट आलेल्या तरुणाच्या साथीदाराने पैसे नेल्याचे ओरडून सांगितले.हा प्रकार नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळवला. पोहेकॉ. विलास वैष्णव, पोहेकॉ. परमेश्वर पायगव्हाणे, पोकॉ. संदीप बीडकर, पोकॉ. अनिल पवार यांनी घटनास्थळाहून सतीश रवी भोई (२०) याला ताब्यात घेतले. पोलीस व जमावाने पकडल्यामुळे सतीश याने आरडाओरड केल्यामुळे त्याचा साथीदार भाऊ शिवाजी रवी भोई हा भावाकडे येताच जमावाने दोघांनाही बेदम चोप दिला.पोलिसांनी जमावाच्या तावडीतून त्या दोघांना ताब्यात घेतले, तर अन्य दोघे पैशाची बॅग घेऊन पळून गेले. या दोघांची दुचाकी (एम.एच.१५, ए.झेड.-४६३) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी सोपान कदम यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपुरात ट्रान्स्पोर्टचालकाचे दोन लाख चौघांनी लुटले
By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST