औरंगाबाद : निवडणुकीची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे अनेक झोनल अधिकाऱ्यांचा बिपी वाढला आहे. त्यामुळे या कामातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कित्येक अधिकारी, कर्मचारी पुढे सरसावले आहेत. त्यासाठी वेगवेगळे वशिले लावले जात आहेत. काही जण उच्च रक्तदाब किंवा इतर आजाराचे कारण पुढे करीत आहेत. विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत २७०० मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी झोनल अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या आॅर्डर काढल्या आहेत. मात्र, निवडणुकीची जबाबदारी ऐकूनच अनेकांचा रक्तदाब वाढला आहे. एक दिवसाची जबाबदारी असली तरी ती टाळण्यासाठी बहुतेक जण प्रयत्न करीत आहेत. त्यातही झोनल अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्यांचा ही जबाबदारी टाळण्याकडे अधिक भर दिसत आहे. या तिन्ही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहे. आता निवडणुकीची प्रक्रिया जवळ आल्यामुळे बहुतेक जण ही नियुक्ती रद्द करण्यासाठी निवडणूक कार्यालयात धाव घेत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वशिले लावले जात आहेत. तसेच काही जण आजारपणाचे कारण देऊन नियुक्ती रद्द करण्याची मागणी करीत आहेत.
अधिकाऱ्यांचा बिपी वाढला
By admin | Updated: September 21, 2014 00:18 IST