औरंगाबाद : पोलीस भरतीच्या वेळी मुंबईमध्ये आतापर्यंत ५ उमेदवारांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी भरतीसाठी घेतल्या जणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणींमध्ये आजपासून आमूलाग्र बदल केले आहेत. विशेषत: गुरुवारपासून संबंधित उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच जे उमेदवार ‘फीट’ आढळले, त्यांनाच धावण्याच्या चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले. यासंदर्भात पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, पोलीस भरतीसाठी खबरदारी घेण्याबाबत महासंचालक कार्यालयाकडून काही निर्देश मिळाले होते. त्यानुसार आम्ही उमेदवारांची काळजी घेत आहोत. ठराविक उमेदवारांना भरतीसाठी निमंत्रित केल्यानंतर पहाटे ५.१५ वाजेपासून त्यांची कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर त्यांची उंची, छाती मोजल्यानंतर १०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाते. त्यानंतर गोळाफेक, थाळीफेक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत उन्हाच्या अगोदर घेतल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच विद्यापीठ परिसरात पात्र उमेदवारांची ५ किलोमीटर लांब धावण्याची चाचणी घेतली जाते. तत्पूर्वी, आदल्या दिवशी घाटी हॉस्पिटलच्या ५ तज्ज्ञ डॉक्टर व ५ सहायक, अशा १० जणांच्या पथकामार्फत संबंधित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या चाचणीत जे उमेदवार फीट असतील, त्यांनाच दुसऱ्या दिवशी सकाळी ५ किलोमीटर धावण्यासाठी पात्र समजले जाते. वैद्यकीय चाचणीतून कोणाला डायबेटीस, हायपर टेन्शन, बीपी अथवा अन्य आजार निष्पन्न झाला, तर त्यांना धावण्याच्या चाचणीसाठी अपात्र ठरविले जाते. गुरुवारपासूनच वैद्यकीय चाचणीमध्ये बदल करण्यात आला आहे.
आता सुरुवातीलाच वैद्यकीय चाचणी
By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST