उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड यांच्याकडे ‘बामुक्टा’ व ‘बामुटा’ या दोन्ही संघटनांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी एकत्रित मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाने इशारा दिला की, काही विघ्नसंतोषी संघटनांचे पदाधिकारी सातत्याने या २८ प्राध्यापकांविरोधी भूमिका घेत असून, प्रशासनावर दबाव आणत आहेत. न्यायालयातही ते अपयशी ठरले आहेत. या प्राध्यापकांची भरती ही रितसर जाहिरात देऊन, आरक्षणाचे नियम पाळून निवड समितीच्या माध्यमातून पार पडली आहे. शासनाने २८ जानेवारी २०१५ च्या निर्णयानुसार या प्राध्यापकांच्या वेतनाचे दायित्व स्वीकारले आहे. अलिकडे १० फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन अनुदानासाठी या प्राध्यापकांच्या नावांचा समावेश ‘एचटीई’ सेवार्थ प्रणालीमध्ये करावा, अन्यथा या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करु, असा इशारा दिला आहे.
शिष्टमंडळात डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. विलास खंदारे, डॉ. एम.बी. धोंडगे, डॉ. राजेश करपे, डॉ. संजय संभाळकर, डॉ. स्मीता अवचार, डॉ. रत्नदीप देशमुख आदींसह ‘त्या’ २८ पैकी काही प्राध्यापकांचाही समावेश होता.