आधरवाडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:06 IST2021-03-10T04:06:02+5:302021-03-10T04:06:02+5:30
केळगाव : येथून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून केळगाव, आधरवाडी, तांडा, कोल्हाळा या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातील ...

आधरवाडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा
केळगाव : येथून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून केळगाव, आधरवाडी, तांडा, कोल्हाळा या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातील पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. असे असताना मात्र, विद्युत मोटारी टाकून अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पाणी उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.
आधरवाडी धरणातून चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील काही दिवसांपासून या धरणातून हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. काही शेतकरी अवैधरित्या धरणात विद्युत मोटार टाकत असून पाणी उपसा करू लागले. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या चारही गावाला पिण्याचे पाण्यासाठी दुसरा स्रोत नाही. त्यामुळे हा अवैधरित्या होणारा पाणी उपसा थांबविला नाही तर भविष्यात भीषण पाणीटंचाई होणार आहे. धरण प्रमुख अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी याकडे कानाडोळा केला आहे.
काय म्हणतात लोक...
केळगाव
आधरवाडी धरणावर सुरू असलेला पाणी उपसा बंद करावा, यासंदर्भात शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अजूनही काही शेतकरी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात गावालाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
- लताबाई वाघमोडे, सरपंच.
केळगावपासून जवळच असलेल्या आधरवाडी धरणातून अवैधरित्या पाणी उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. काही शेतकरी रात्री मोटारी सुरू करून पिकांना पाणी देत आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- साहेबराव पवार, तांडा, ग्रामस्थ.
------
फोटो
: केळगावजवळील आधरवाडी येथील धरणातील उपलब्ध साठ्यातून पाण्याची चोरी केली जात आहे.