उस्मानाबाद : पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारी आषाढी पौर्णिमा म्हणजेच ‘गुरूपौर्णिमा’. गुरूपौर्णिमेदिवशी गुरूला वंदन केले जाते. गुरूची महती सांगणाऱ्या अनेक अख्यायिका जगप्रसिध्द आहेत़ गुरूंकडे जीवनानुभव असतो. त्यामुळे शिष्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच आज विविध क्षेत्रात अनेकांनी यशोशिखरे गाठली आहेत. सामाजिक, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’कडे गुरूंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांमध्येच गुरू पाहतोशेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याने माझ्या आयुष्यात सर्वांच्याच प्रेरणा महत्त्वपूर्ण आहेत. समाजातील प्रत्येकाकडून आपण कुठली ना कुठली प्रेरणा घेतच असतो. निसर्गाकडूनही आपण बरेच काही शिकतो. त्यामुळे तो सुध्दा आपला गुरुच आहे. त्यामुळे मी सर्वांमध्येच गुरू पाहतो. गुरूपरंपरेत प्राथमिक शिक्षण घेत असताना भालचंद्र देशमुख, गोपाळराव कुलकर्णी, रा. द. आरगडे, रंगनाथ तिवारी, विद्यापीठात वा. ल. कुलकर्णी, गो. मा. पवार, यु. म. पठाण आदींकडून मला विशेष प्रेरणा मिळाली. याशिवाय आई-वडील आणि या क्षेत्रातील मित्रमंडळींकडूनही मला खूप काही मिळाले. नागनाथ कोतापल्ले, भा. न. शेळके आदींच्या प्रेरणाही सोबत आहेतच. गंगाधर पानतावणे यांचाही उल्लेख मी आवर्जून करेन. ज्या-ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केले, ते सर्वच माझ्या गुरूस्थानी आहेत. ज्यांनी-ज्यांनी माझे साहित्य वाचले व मला प्रेरणा दिली, त्या सर्व व्यक्तीही माझ्या कर्तृत्वाला कारण आहेत. - प्रा. भास्कर चंदनशिव, ज्येष्ठ साहित्यिकगुरूशिवाय जीवनात यश अशक्य...ज्या व्यक्तीवर आपली मनापासून श्रध्दा असते तोच आपला गुरू असतो. गुरूशिवाय माणूस जीवनात यशस्वी होऊच शकत नाही. माझे आई-वडील पूर्वीपासूनच धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. परमेश्वराचे अस्तित्व आहे, यावर माझी श्रध्दा आहे. १९९०-९१ मध्ये मी रोजगारासाठी पुण्यात दाखल झालो. त्यावेळी कठीण संघर्ष करावा लागला. मात्र, आई-वडिलांचे संस्कार आणि परमेश्वरावरील श्रध्दा यामुळे व्यवसायात यशस्वी होऊ शकलो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सभोवतालच्या माणसाचे जीवनही आनंदी असले पाहिजे, या भावनेने काम करतो. त्यामुळेच सोनारी, कंडारी यात्रेत मोठ्या प्रमाणावर मी अन्नदानाचा उपक्रम राबविला. मागील चार वर्षांपासून कंडारी येथे मोठा सप्ताह घेतो. या सर्व उपक्रमांमुळे आत्मिक समाधान मिळते. आई-वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीमुळेच मला अशा प्रकारे लोकांची सेवा करता आली. त्यामुळे आई-वडील हेच माझे गुरू आहेत. पुण्यामध्ये आल्यानंतर कृष्णाजी वैद्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. गेल्या २३ वर्षांपासून मी व्यवसाय करीत आहे. - भैरवनाथ शिंदे मूल्यांची शिकवण देणारे गुरूस्थानीआयुष्यात ज्या-ज्या व्यक्तीकडून मला मुल्यांची शिकवण मिळाली, त्या सर्वांनाच मी गुरूस्थानी पहातो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर आपणाला वेगवेगळी माणसे भेटत असतात. त्यांच्याकडून आपणाला काही ना काही शिकायला मिळते. माझी आई उमा राशिनकर यांच्याकडून खऱ्या अर्थाने मला वेगवेगळ्या मुल्यांचे बाळकडू मिळाले. आपले आयुष्य हे सेवा करण्यासाठी आहे, असे त्या सातत्याने सांगत. त्यानंतर सातारा येथे शिक्षणासाठी आल्यानंतर शाळेतील प्रीन्स सर नेहमी सांगत असत, आपण जगत असलेल्या आयुष्याबाबत देवालाही अभिमान वाटला पाहिजे आणि स्वत:लाही. एस. गायकवाड, प्रा. विभुते, राजश्री साळुंके ही आदर्शवादी माणसे माझ्या आयुष्यात आली. विद्वान सर्वत्र पूजते. विद्वान बनायचे असेल तर ज्ञान मिळविले पाहिजे. आणि ते पुस्तक वाचल्याशिवाय मिळत नाही, असे ते नेहमी सांगत. हीच शिकवण मी अंगिकारली. हाच कानमंत्र घेवून मी आयुष्यरूपी मार्गावरून चालत आहे. आजघडीला माझे देशभरातील तब्बल १ हजार ७०० विद्यार्थी सेट-नेट उत्तीर्ण झाले आहेत.- प्रा. गजानन राशिनकरआजी-आजोबांपासून समाजकार्याची प्रेरणापरंपरेनुसार आपण शिक्षकांना किंवा मार्गदर्शकांना गुरु मानतो. परंतु, समाजात प्रत्येकाकडून शिकण्यासारखे काही तरी असतेच. त्यामुळे कुणा एखाद्याला गुरू म्हणणे योग्य वाटत नाही. माझ्या आजी-आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कहाण्या ऐकतच मी लहानाची मोठी झाले आणि त्यातूनच मला समाजकार्याची प्रेरणा मिळत गेली. महाविद्यालयात असताना देखील मी सतत दुसऱ्यांना मदत करीत होते. माहेरसोबतच सासरकडील मंडळीही समाजकार्यात पुढे असतात. त्यामुळे माझे हे काम लग्नानंतरही चालूच राहिले. आज मी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असले तरी यातूनही मी शक्य तेवढे समाजकार्य करते. माझे आदर्श म्हणाल तर माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्योती म्हापसेकर, शारदा साठे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, माझे आई-वडील, भाऊजी, प्राचार्य, प्राध्यापक आदींची नावे घेता येतील. याशिवाय माझी मुले, संस्थेतील सहकारी, या क्षेत्रातील सहकारी यांच्याकडूनही मला नेहमी काही ना काही शिकायला मिळते. - डॉ. स्मिता शहापूरकर, सामाजिक कार्यकर्त्याआद्यगुरू माझे आई-वडीलच...माझ्या जीवनात मी आज जो काही आहे तो गुरूंमुळेच़ माझे अद्यगुरू आई-वडिल आहेत़ त्यांच्या अपार कष्टातून आज मी मोठे यश मिळवू शकलो़ आई-वडिलांनी मला प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात योग्य मार्गदर्शन केले आहे़ आज सर्जन म्हणून काम करीत असताना दिवसेंदिवस विविध बाबी शिकण्यावर माझा भर असतो़ उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले़ तेथे मुख्याध्यापक एम़ डी़ देशमुख यांच्या मार्गदर्शनाचा मला उभ्या आयुष्यासाठी मोठा लाभ मिळाला़ त्यांनी दिलेल्या शिदोरीवर मी एमबीबीएस, एम़एस़ केले़ या दरम्यानच्या काळात शिक्षण घेत असातना अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. एम़एस़शिक्षणादरम्यान डॉ़ नितीन साठे हे मला गुरू भेटले़ डॉ़ साठे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि मला घडविण्यासाठी केलेले प्रयत्न मोठे आहेत़ त्यांच्या यथायोग्य मार्गदर्शनामुळे आज नाशिक सारख्या शहरात प्लास्टिक सर्जरीचा सर्जन म्हणून मी यशस्वीरीत्या काम करीत आहे़ शिक्षणादरम्यानही अनेकांचे मार्गदर्शन लाभले़ त्याचाही मला मोठा लाभ झाला़ एकंदरीतच जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचे आहे. - डॉ़ सुधीर शिंदे
गुरू: साक्षात्परं ब्रह्म...
By admin | Updated: July 12, 2014 01:16 IST