बजाजनगरात अभिवादन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:02+5:302021-01-13T04:10:02+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील शहीद भगतसिंह हायस्कूलमध्ये मंगळवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

बजाजनगरात अभिवादन कार्यक्रम
वाळूज महानगर : बजाजनगरातील शहीद भगतसिंह हायस्कूलमध्ये मंगळवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गौतम शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देशमुख, रामा चोपडे, वर्षा जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला महादेव लाखे, शहाजी भूकन, जितेंद्र बरंजाळेकर, सुनंदा गायकवाड, सोनल पाटील, अतिश डोईफोडे, राजेंद्र मघाडे, हरिश्चंद्र गवळी, अंबिका साळवे, आशिष मात्रे आदींची उपस्थिती होती.
----------------------------
पोलीस कॉलनीत विजेचा लपंडाव
वाळूज महानगर : पंढरपुरातील पोलीस कॉलनीत विजेचा सतत लंपडाव सुरू असल्यामुळे वीज ग्राहक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीत दिवसभरातून अनेकदा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना न देता वीज पुरवठा बंद केला जात असल्याने नागरिक व व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बराच वेळ वीज येत नसल्यामुळे वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
----------------------------
तीसगाव चौफुलीवर सिग्नल बसवा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातून तीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौफुलीवर वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मुंबई - नागपूर महामार्गही या चौफुलीवरून गेलेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक सिग्नल नसल्यामुळे तीसगाव व सिडकोकडून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत धरूनच रस्ता पार करावा लागत आहे. या चौफुलीवरून रस्ता पार करण्याच्या प्रयत्नात किरकोळ स्वरुपाचे अपघातही होत असल्याने या चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
------------------------
मोहटादेवी - सिडको रस्त्यावर मोकाट कुत्रे
वाळूज महानगर : बजाजनगर - मोहटादेवी रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने वाहनधारक व नागरिकांत भीतीचे वातवरण पसरले आहे. या रस्त्यावरील मांस व मासे विक्रेते मांसाचे टाकाऊ तुकडे रस्त्यालगतच टाकत असल्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तसेच वाहनधारक व नागरिकांच्या अंगावर मोकाट कुत्रे धावून जात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
--------------------------
दिशा कुंजबन सोसायटीत जिजाऊ जयंती
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी परिसरातील दिशा कुंजबन अपार्टमेंटमध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नंदाताई राजपूत, सुजाता बोबडे, नीता देशमुख, अश्विनी गवळी, उषा पठारे, अंजली देशमुख, शीतल खेडकर, आशा सिरसले, रेवती देशपांडे, मनीषा पाटील, मयुरी खंडेलवाल, भावा राक्षेल, भाग्यश्री चव्हाण, अनिता जाधव, कांचन जोशी आदींची उपस्थिती होती.
-------------------------