उस्मानाबाद : शहरातील रसुलपुरा आणि खिरणीमळा भागातील चार कत्तलकान्यांना अचानक भेट देवून पालिकेच्या स्वच्छता पथकाने इनकॅमेरा पंचनामा केला आहे. हे कत्तलखाने विनापरवाना चालविले जात असल्याचे सांगत पालिकेकडून संबंधितांविरूद्ध उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नव्हती.शहरातील रसुलपुरा आणि खिरणीमळा या भागामध्ये अनधिक्रतपणे कत्तलखाने सुरू असल्याबाबत संबंधित भागातील रहिवाशांतून ओरड होत होती. याबाबत पालिकेकडे तक्रारीही येत होत्या. त्यावर पालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी या प्रकरणी स्वच्छता पथकास संबंधित कत्तलखान्यांची पहाणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहा सदस्यांचे पथक मागील तीन दिवसांपासून या भागात फिरत होते. कुठल्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या पथकाला पोलिस सरंक्षणही पुरविण्यात आले होते. मागील दोन दिवस या पथकाने संबंधित चार कत्तलखान्यांची पहाणी केली. खात्री पटल्यानंतर या पथकाने शनिवारी व्हिडीओ चित्रिकरणासह संबंधित कत्तलखान्यांचा पंचनामा केला. सदरील कत्तलखाने अनधिक्रतपणे चालविले जात आहेत. तसेच कत्तलीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमाणपत्रही घेतले जात नाही. कत्तलीनंतर निरूपयोगी अवयवांची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली जात नसल्याचे या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असली तरी शनिवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतीत कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)४मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या पथकाने संबंधित चारही कत्तलखान्यांचे पंचनामे केले आहेत. खबरदारीचा भाग म्हणून या पथकाने पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने पथकासाठी तीन पोलिस कर्मचारी तैनात केले होते.शहरातील संबंधित कत्तलखान्यांच्या परिसरातील नागरिकांतून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळेच पालिकेच्या स्वच्छता पथकास भेट देवून पहाणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाने व्हिडीओचित्रिकरणासह पंचनामा केला असून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी शशिमोहन नंदा न्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून कत्तलखान्यासंदर्भात फिर्याद देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध बाबी नमूद केल्या असून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिवेक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चार कत्तलखान्यांचे पंचनामे
By admin | Updated: December 14, 2014 00:06 IST