वडिलांचा हात मोडला अन् मुलीच्या हाती आले कोयते !
By Admin | Updated: December 14, 2014 00:05 IST2014-12-14T00:01:09+5:302014-12-14T00:05:59+5:30
उस्मानाबाद : पाऊस न पडल्याने खरीप हाती लागले नाही. अन् रबीची पेरणी होवू शकली नाही.

वडिलांचा हात मोडला अन् मुलीच्या हाती आले कोयते !
उस्मानाबाद : पाऊस न पडल्याने खरीप हाती लागले नाही. अन् रबीची पेरणी होवू शकली नाही. त्यामुळे पाच-सहा एकर माळरान जमीन असूनही केज तालुक्यातील मांडवखेल येथील कदम दाम्पत्य पोटाचे खळगे भरण्यासाठी बैलगाडी घेवून ऊसतोडीला आले. मात्र पंधरा ते वीस दिवसांपूर्वी गाडीवरून पडून आत्माराम कदम यांचा हात मोडला अन् आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या आत्माराम यांच्या अवघ्या १४ वर्षीय कन्येला शाळा सोडून हाती कोयते घ्यावे लागले. हाती चाबूक घेवून बैलगाडीही हाकणाऱ्या या मुलीला आपल्या शिक्षणावर मात्र, पाणी फेरावे लागले आहे.
आत्माराम कदम हे केज तालुक्यातील मांडवखेल येथील रहिवाशी. त्यांना गावामध्ये पाच ते सहा एकर जमीन आहे. परंतु, सर्वच माळरान. पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्यामुळे शेती पावसाच्या भरवशावरच. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पाऊस होत असल्याने शेती असून नसल्यासारखी. परिणामी आत्माराम कदम यांनी ऊसतोडीचे काम सुरू केले. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून ते दोन मुले आणि एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवितात. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने आत्माराम कदम यांनी केशेगाव येथील साखर कारखान्याची ऊसतोडीची उचल घेतली. आणि आत्माराम व त्यांच्या पत्नी आशाबाई हे दाम्पत्य बैलगाडीसह उसतोडीसाठी केशेगाव परिसरामध्ये दाखल झाले. प्रत्यक्ष ऊसतोडीला सुरूवात केली असतानाच गाडीमध्ये ऊस भरताना ते खाली पडले. सदरील घटनेत त्यांचा उजवा हात मोडल्याने त्याला प्लॅस्टर करावे लागले.
पर्यायाने ऊसतोडीचे काम ठप्प झाले. काम बंद राहिल्यास मुकादमाचे पैसे कसे फेडणार? बैलांना कसे जगविणार? असे एक ना अनेक प्रश्न या दाम्पत्यासमोर उभे राहिले. दरम्यान, या घटनेची माहिती कळाल्यानंतर आठवीच्या वर्गामध्ये शिकणारी आत्माराम यांची कन्या दैवशाला ही शाळा सोडून वडीलांच्या मदतीला धावून आली. त्यामुुळे दैवशालाच्या हातातील पेन गळून पडला. शाळेत जावून शिक्षणाचे धडे गिरविण्याऐवजी उसाच्या फडामध्ये उतरून कोयते चालविण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या दैवशाला आणि तिची आई आशाबाई या दोघी मायलेकी न खचता मोठ्या ताकदीने इतर सहकाऱ्यांच्या बरोबरीने ऊसतोडीचे काम करीत आहेत. या संकटामुळे मात्र, दैवशालाच्या शिक्षणाला ‘बे्रक’ लागला आहे. (प्रतिनिधी)४
पाच ते सहा एकर जमीन आहे. परंतु, संपूर्ण माळरान. पाण्याची सोय नाही. वर्षागणिक पर्जन्यमानही कमी होवू लागले आहे. त्यामुळे पेरणी केली तरी पिके हाती लागत नाहीत. यंदा तर बरबडाही उगवला नाही. परिणामी मुलांना नातेवाईकांकडे ठेवून कोयते हाती घ्यावे लागले, असे आत्माराम यांच्या पत्नी अशाबाई यांनी सांगितले.४
आत्माराम यांना राम आणि शाम ही दोन मुले आहेत. राम हा नववीच्या वर्गात शिकत असून शाम हा दहावीच्या वर्गामध्ये आहे. आईवडील ऊसतोडीसाठी आल्याने यापैकी रामच्या सांभाळ करण्याची जबाबदारी मावशीने घेतली. तर शामची जबाबदारी त्यांच्या गुरूजीने घेतली असल्याचे आत्माराम यांनी सांगितले. मोठ्या मुलीचा विवाह झाला आहे. तर दैवशाला ऊसतोडीच्या कामामध्ये मदत करू लागत आहे.