राजकारणातील नशिबाचा ‘खेळ’
By Admin | Updated: August 6, 2015 01:03 IST2015-08-06T00:35:30+5:302015-08-06T01:03:38+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद राजकारणात नशिबाने साथ दिली व सोडली तर काय होऊ शकते, याची प्रचीती बुधवारी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतून आली.

राजकारणातील नशिबाचा ‘खेळ’
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
राजकारणात नशिबाने साथ दिली व सोडली तर काय होऊ शकते, याची प्रचीती बुधवारी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतून आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी माजी सभापती संजय औताडे यांना तिकीट नाकारून नवचेहऱ्यांना संधी दिली; पण औताडे यांनी हार न मानता निवडणूक लढविली व अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आले. एवढेच नव्हे तर काँग्रेसमध्ये प्रवेश करीत सभापतीपदासाठी दावेदारी दाखल केली. भाजपने काँग्रेसचा एक संचालक फोडून संचालकांची आकडेवारी बरोबरीत आणली; पण अखेर लकी ड्रॉद्वारे औताडे भाग्यवान ठरले. नशिबाच्या बळावर औताडे सभापती झाले. दुसरीकडे बागडे यांनी सुरुवातीपासून टाकलेला प्रत्येक फासा उलटा पडत गेला. आधी मतदारांनी आणि आता नशिबानेही साथ दिली नाही. यास ‘नसीब अपना अपना’ असेच म्हणावे लागेल.
मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक म्हणून संजय औताडे ओळखले जात होते. बागडे यांच्याच आशीर्वादाने बाजार समितीच्या २००५ च्या निवडणुकीत संजय औताडे निवडून आले व सभापती झाले होते. तेव्हापासून गुरू-शिष्याची जोडी म्हणून दोघांना ओळखले जाई. विधानसभेच्या निवडणुकीत फुलंब्री तालुक्यातून बागडे यांना निवडून आणण्यासाठी संजय औताडे यांनी परिश्रम घेतले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत पक्ष पुन्हा आपणास तिकीट देईल व आपण सभापती होऊ असे स्वप्न औताडे यांनी बघणे सुरू केले. दरम्यानच्या काळात हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष बनले व त्यांनी बाजार समिती निवडणुकीत सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
यामुळे औताडे यांचा पत्ता कटला. आपल्यावर अन्याय झाला या भावनेतून औताडे यांनी बागडे यांच्या निर्णयाविरोधात दंड थोपाटले आणि कृउबा समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी मारली. दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यापासून हरिभाऊ बागडे यांचा सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क कमी झाला. एवढे मोठे पद मिळूनही फुलंब्री तालुक्याच्या विकासासाठी बागडे यांनी काहीच काम केले नाही, याचाही मतदारांमध्ये रोष होताच.
१२ जुलै रोजी कृउबाचे मतदान झाले आणि १३ जुलै रोजी मतमोजणीत नवीन संचालक निवडून आले. यात सर्वाधिक ४६५ मते घेऊन संजय औताडे निवडून आले. तसेच भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार विकास दांडगेही ३५४ मते मिळवून विजयी झाले.
यात बागडे यांच्या पॅनलचे ६ व कल्याण काळे यांच्या पॅनलचे ७ उमेदवार निवडून आले. सत्ता हाती नसतानाही काळे यांनी बागडे यांच्या पॅनलपेक्षा एक उमेदवार अधिक निवडून आणण्यात यश मिळविले. औताडे यांना तिकीट न देण्याचा फटका बागडे यांना बसला. दोन व्यापारी संचालक व हमाल-मापाडी यांना सोबत घेऊ; पण औताडे यांना सभापती होऊ द्यायचे नाही, अशी प्रतिज्ञाच बागडे व त्यांच्या पॅनलच्या संचालकांनी घेतली. कल्याण काळे यांनी याच संधीचा फायदा उचलत औताडे यांना सभापतीपदाची आॅफर दिली. औताडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत बागडे यांना दुसरा धक्का दिला. बागडे यांच्या पॅनलने काँग्रेसच्या पॅनलमधील गणेश दहीहंडे यांना सभापतीपदाची आॅफर देऊन फोडत औताडे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष संचालक विकास दांडगे व हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनी औताडे यांना मतदान केले. भाजप व काँग्रेसच्या पॅनलला ९-९ मते मिळाली.
सभापती व उपसभापती निवडीसाठी अखेर लकी ड्रॉचा निर्णय घेण्यात आला. औताडे यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि सभापती बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र दुसरीकडे बागडे यांना नशिबाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. उपसभापतीपदावरच त्यांच्या पॅनलला समाधान मानावे लागले. अखेर राजकारणात काहीही घडू शकते हे सिद्ध करीत औताडे हे गुरुपेक्षा वरचढ शिष्य निघाले.
या निकालाचा परिणाम औरंगाबाद किंवा फुलंब्री तालुक्यावर नव्हे तर जिल्ह्यात दिसून येईल. राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक ठरली आहे.